कोकणातलं एक गाव सात दिवस सुट्टीवर, गावपळणीच्या परंपरेची समृद्ध बातमी

गावपळण ही अशीच एक प्रथा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सिंधुदुर्गातील वैभववाडी शिराळे गावातील लोक गुराढोरांसह सात दिवस वेशीबाहेर झोपड्या बांधून वास्तव्य करतात.

कोकणातलं एक गाव सात दिवस सुट्टीवर, गावपळणीच्या परंपरेची समृद्ध बातमी

सिंधुदुर्ग : तुम्ही आतापर्यंत पूर्ण गाव सुट्टीवर गेल्याचं कधी ऐकलंय का? नाही ना! (Shirole Village Gaonpalan Ritual) मग आम्ही तुम्हाला सिंधुदुर्गातील एका अशा गावात घेऊन जाणार आहोत, जे वर्षातून एकदा सात दिवसांच्या सुट्टीवर जातं. तेही अगदी माणसांबरोबरच गुरढोरं, कोंबडी कुत्र्यांसह (Shirole Village Gaonpalan Ritual).

कोकणात अनेक वेगवेगळ्या रुढी परंपरा पहायला मिळतात. गावपळण ही अशीच एक प्रथा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सिंधुदुर्गातील वैभववाडी शिराळे गावातील लोक गुराढोरांसह सात दिवस वेशीबाहेर झोपड्या बांधून वास्तव्य करतात. 80 ते 90 उंबरठे असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे 400 ते 500 च्या दरम्यान आहे. मात्र, सध्या हे गाव या लोकांच्या गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे.

गेली 200 ते 300 वर्षांपासून गावपळणीची परंपरा येथील लोकं पाळत आले आहेत. म्हणूनच आपले घरदार सोडून गावाच्या वेशीबाहेर आलेल्या या लोकांनी आभाळाच्या छायेखालीच सात दिवसांसाठी आपला संसार थाटला आहे.

शिराळे गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे वार्षिक कौल समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण सात दिवसांची असते. सात दिवस झाल्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासीय गावात परततात.

गावपळण सुरु झाल्यानंतर कुणीही गावात जात नाहीत. कारण या दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते, असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे गावात कोणाचाही आवाज होता कामा नये. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावभरणी होते. जोपर्यंत गांगोचा हुकूम होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात.

गावाच्या वेशी बाहेर एका ठिकाणी सर्वजण झोपड्या बांधून राहतात 5 ते 7 दिवसासाठी लागणारे साहित्य, कपडे, अन्नधान्य, गुरे, कोंबडी, कुत्रे सगळं काही न विसरता घेत वेषीबाहेर मुक्काम केला जातो. गावपळणीचे 5 ते 7 दिवस हे गावकऱ्यांसाठी मंतरलेले असतात. ही गावपळण एन्जॉय करण्यासाठी चाकरमानी देखील हजेरी लावतात.

काही काळ निसर्गाच्या कुशीत, आभाळाच्या छायेत, स्वच्छंदी वातावरणात नेहमीच्या जीवनापेक्षा वेगळा अनुभव घेत असतानाच सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्याचे महत्त्वाचे कार्यही ‘गावपळणी’च्या माध्यमातून होत असते. गावपळणीची परंपरा सुरु होण्यामागे विविध दंतकथाही सांगितल्या जातात. त्यात नैसर्गिक आपत्ती, वाईट शक्तींचा वावर किंवा सतीच्या शापांची पूर्तता असे अनेक संदर्भ येतात. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात प्रथा परंपरा जपत असताना त्याला अंधश्रेद्धेचा विळखा पडू दिला जाऊ नये एवढंच.

Shirole Village Gaonpalan Ritual

संबंधित बातम्या :

लातूरच्या लेकीचा सलग 24 तास लावणी करण्याचा निर्णय, 26 जानेवारीला घडवणार इतिहास

गडचिरोलीमध्ये संविधानाचा विजय, 38 वर्षानंतर नक्षली हल्ल्याविना ग्रामंपचायत निवडणूक संपन्न

दुसरीही मुलगी झाली म्हणून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, डॉक्टर पती फरार, पोलीस कन्येची हादरुण सोडणारी बातमी

नांदेडच्या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर, गतवर्षी दोघांचा वाचवलेला जीव

Published On - 9:51 am, Mon, 25 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI