शिवसेनेच्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल, व्यापाऱ्याला शिवीगाळ करत धमकी दिल्याने खळबळ
MLA Amol Khatal Audio Clip Viral : शिवसेनेच्या आमदाराची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या आमदार व्यापाऱ्याला शिवीगाळ करत धमकी देताना दिसत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच आता शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात अमोल खताळ यांनी संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे दिसत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अमोल खताळ यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे? ( टीव्ही 9 मराठी या ऑडिओक्लिपची पुष्टी करत नाही)
(आमदार अमोल खताळ यांचा PA )
हॅलो, आमदारसाहेबांसोबत बोलाना…
आमदार अमोल खताळ – हॅलो..
संगमनेरमधील व्यापारी – हॅलो
आमदार अमोल खताळ – हॅलो, काय अडचण आहे यांच्या गाडीची?
संगमनेरमधील व्यापारी – कोण बोलतंय?
आमदार अमोल खताळ – अमोल खताळ बोलतोय
संगमनेरमधील व्यापारी – हा, बोलाना
आमदार अमोल खताळ – अरे तू कोण बोलतोय म्हणतो म्हणजे तू लई शहाणा दिसतोय रे.. तुला सांगुनही तू लई शहाणा झाला का हरामखोर.. तू शहाणपणा करतो का रे जास्त.. तुझा मालक कोण आहे?, त्याला मला फोन करायला लाव मला.. नाहीतर उद्या बंद करून टाकतो तुझं शोरुम.. एवढा शहाणा आहे का तू, का रे?…तुला सांगितलं तरी तू मला विचारतो कोण बोलतो?.. थांब तुझ्याकडे पहातो उद्या.. माजला काय जास्त तू?…
संगमनेरमधील व्यापारी – अमोल भाऊ विषय त्यांचा वेगळा आहे.. सर्व्हिस…
आमदार अमोल खताळ – अरे ए.. त्या गाडीचे काय करायचे ते पाहतो.. मला मालकाचा नंबर पाठव.. 10 मिनिटात मला त्याचा फोन आला पाहिजे.. तू एवढा शहाणा झाला का?.. बघतो मी तू शोरुम इथे कसं चालवतो..एवढा माजलाय तू का रे..
अमोल खताळ यांचे स्पष्टीकरण
व्हायरल ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, ही ऑडिओ क्लिप जुनी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात एडिटिंग करण्यात आली आहे. गाड्यांचा पार्ट बदलण्याचा प्रकार एक दोन वेळेस झाला होता, त्यामुळे आधीही आम्ही एक दोन वेळेस त्यांना जाब विचारला होता की तुम्ही ग्राहकांची फसवणूक का करत आहात. कोणी चुकीचं काम करत असेल तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याची धमक शिवसेनेचा आमदार आणि कार्यकर्ता म्हणून आहे. माझ्या भावना त्यावेळेस तीव्र होत्या, आताही त्यांच्याकडून यात सुधारणा झाली नाही तर आमच्या भावना आजही तीव्रच राहतील.
