राजकोट किल्ल्यावरील राडा गृहखात्याच्या संगनमताने…ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप
निलेश राणे यांनी किल्ल्यावर केलेल्या राड्यासंदर्भात बोलताना वैभव नाईक म्हणाले, पोलिसांकडून काय अपेक्षा करणार आहे. गृह खात्याकडून अन् पोलिसांकडून आमची कुठलीही अपेक्षा नाही. जोपर्यंत हे सरकार बदलत नाही, तोपर्यंत दडपशाहीचे राजकारण चालणार आहे.

Vaibhav Naik : राजकोट येथील किल्ल्यावर भाजप नेते अन् खासदार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. सुमारे दोन तास किल्ल्यावरील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणावरुन शिवसेना उबाठा नेते वैभव नाईक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. किल्ल्यावर घडलेला प्रकार हा गृहखात्याच्या संगनमताने झाला होता. त्यांना कुठल्यातरी प्रकरणात आम्हाला अडकवायचे होते. नारायण राणे यांचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. राज्याचे गृहखात त्यांच्या हातचे बाहुले झाले आहे. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होतील, त्याची आम्हाला जाणीव आहे. या गुन्ह्यांना आम्ही भीक घालणार नाही. राणेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. त्याविरुद्ध पोलीस स्थानकात मी तक्रार दाखल करणार आहे. याआधी माझे काका श्रीधर नाईक यांची अशीच हत्या झाली होती. त्या प्रकरणात राणे मुख्य आरोपी होते. त्यावेळी तक्रार दाखल करून आम्हाला न्याय मिळणार नाही.
त्या हेलिपॅडचे काय झाले?
निलेश राणे यांनी किल्ल्यावर केलेल्या राड्यासंदर्भात बोलताना वैभव नाईक म्हणाले, पोलिसांकडून काय अपेक्षा करणार आहे. गृह खात्याकडून अन् पोलिसांकडून आमची कुठलीही अपेक्षा नाही. जोपर्यंत हे सरकार बदलत नाही, तोपर्यंत दडपशाहीचे राजकारण चालणार आहे. पंतप्रधान येणार म्हणून राजकोट येथे तात्पुरत्या हेलिपॅड उभारले होते. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. ते हेलिपॅड आता अस्तित्वातच नाही. यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
अजित पवार गट मूक आंदोलन
अजित पवार यांनी आंदोलन करावे. शिवप्रेमी म्हणून त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. परंतु त्यांनी सत्तेतून बाहेर पडायचे धाडस दाखवायला हवे. अजित पवार यांनी सत्तेवर लाथ मारली पाहिजे, अशी नौटंकी करून चालणार नाही. खरच शिवप्रेमी असाल तर सत्तेवर लाथ मारा, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.
आता लोकांना विश्वासात घ्या
पुतळा उभारण्यासाठी नौदल दिनाच्या आधी बैठका झाल्या होत्या. त्यानंतर देखील नवख्या शिल्पकाराला पुतळा उभारणीचे काम देण्यात आले. आता नवीन पुतळा उभारताना लोकांना आणि शिवप्रेमींना विश्वासात घ्यायला हवे. कारण तुमच्या बैठकांवर लोकांचा आणि आमचा विश्वास राहीला नाही, असे वैभव नाईक यांनी म्हटले.
