Shivsena vs BJP : परस्परांचे कार्यकर्ते फोडाफोडीवरुन महायुतीत घमासान, शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उलटं सुनावलं, ‘सुरुवात तर…’
Shivsena vs BJP : आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. याला कारण होतं, भाजपमध्ये शिवसेनेतून सुरु असलेलं इन्कमिंग. या विषयी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण तिथे त्यांना काही गोष्टी ऐकाव्या लागल्या.

राज्यात दोन ते तीन पक्षांचं मिळून सरकार असताना काही मुद्यावरुन मतभेद होणं स्वाभाविक आहे. राज्यातील महायुतीचं सरकार सुद्धा याला अपवाद नाही. मागच्या तीन वर्षांपासून राज्यात महायुतीच सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. यात भाजप-शिवसेना हे पूर्वीपासून हिंदुत्वाच्या मुद्यावरुन एकत्र आहेत. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा महायुती सत्तेवर आली. सरकार आल्यानंतर काही मुद्दे किंवा निर्णयावरुन महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये छोट्या-मोठ्या कुरबरी होत्या. पण आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने हे मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. एकटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते.
आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून आपला नाराजी दाखवून दिली. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांना भाजपमध्ये थेट प्रवेश दिला जातोय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थतता आहे. ती आज मंत्र्यांनी किती मोठ्या प्रमाणात आहे, ते दाखवून दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रविंद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचं काम रविंद्र चव्हाण करत असल्याची तक्रार केली.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
याबाबत दोन दिवसांत समन्वय समितीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. डोंबिवलीत आज शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला भाजपत प्रवेश देण्यात आला. त्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका. पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं” असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
