
सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. अशातच आता सोलापूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी व्यक्तीची हत्या झाली आहे. शहरातील लष्कर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती कोण होता? हत्येचे नेमके कारण काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरातील लष्कर परिसरात ही घटना घडली आहे. अय्युब सय्यद असे हत्या झालेल्या इच्छुक उमेदवाराचे नाव आहे. या हत्येनंतर संशयित आरोपी सिसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते अशी माहिती आता समोर आली आहे.
अय्युब सय्यद यांनी प्रभाग 16 मधून निवडणुकीची तयारी केली होती. याबाबत त्यांनी व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. विशेष म्हणजे त्या इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. याशिवाय अय्युब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांचे सोने असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अय्युब सय्यद यांच्या हत्येबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. CCTV दृश्यांनुसार काल रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी लोक हे अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करत होते. तेच तीन लोक रात्री 2 च्या सुमारास परत जाताना दिसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
आज दुपारी अय्युब सय्यद यांच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्याने या अज्ञात 3 इसमांनीच अय्युब यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान अय्युब यांची हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली? यांचा तपास देखील सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने केला जात आहे.