सेल्फीचा मोह जीवावर, नदीत बोट उलटून पिता-पुत्राचा मृत्यू, मायलेकी बचावल्या

बोटीत एकत्रितपणे उभं राहून सर्वांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या नादात बोट पाण्यात उलटली. (Solapur Ujani River Boat Overturned)

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 9:50 AM, 1 Mar 2021
सेल्फीचा मोह जीवावर, नदीत बोट उलटून पिता-पुत्राचा मृत्यू, मायलेकी बचावल्या
उजनी नदीपात्र

सोलापूर : सेल्फीच्या नादात बोट उलटून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापुरात उजनी नदीपात्रात बोटीतून सैर करताना ही दुर्दैवी घटना घडली. बोट उलटल्यानंतर मायलेकींना वाचवण्यात यश आलं, परंतु बापलेकाचा बुडून मृत्यू झाला. (Solapur Ujani River Boat Overturned Father Son Dies)

उजनी नदीपात्रात सहकुटुंब नौकाविहार

शेंडगे कुटुंबीय रविवारी संध्याकाळ उजनी पात्रात बोटीतून सैर करण्यासाठी गेले होते. नदीच्या किनार्‍यापासून बोट तीनशे मीटर अंतरावर गेल्यानंतर सर्वांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. बोटीत एकत्रितपणे उभं राहून सर्वांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या नादात बोट पाण्यात उलटली.

सेल्फी काढताना बोट उलटली

बोट पाण्यात उलटताच शेंडगे कुटुंबीयांसह बोटीतील इतर प्रवासीही पाण्यात पडले. मच्छिमार आणि स्थानिक युवकांनी पत्नी स्वाती शेंडगे, मुलगी अंजली विकास शेंडगे यांच्याशिवाय अन्य चौघा जणांना पाण्यात बुडण्यापासून वाचवले.

बाप-लेक बुडाले, माय-लेक वाचल्या

वडील विकास गोपाळ शेंडगे, अजिंक्य विकास शेंडगे यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील नदीपात्रात ही घटना घडली. या घटनेमुळे शेंडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वर्ध्यात दोघा मित्रांचा सेल्फीच्या नादात मृत्यू

वर्ध्यातही सेल्फी काढताना तलावात बुडून काही दिवसांपूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता. कारंजा तालुक्यातील उमरी परिसरातील सहा जण धावसा हेटी तलावात सेल्फी काढायला गेले होते. सेल्फी काढण्यापूर्वी मित्रांनी तलावाशेजारी फेरफटका मारला. त्यानंतर तलावाजवळ असलेल्या खोल खड्ड्याच्या बाजूला सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी आणखी एक जणही तलावात पडला. या घटनेत दोघांना प्राण गमवावे लागले होते. (Solapur Ujani River Boat Overturned Father Son Dies)

लग्नाच्या तोंडावर वधूचा विहिरीत पडून मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात तरुण जोडपं विहीरीत पडल्याची दुर्दैवी घटना वर्षभरापूर्वी चेन्नईत घडली होती. या घटनेत 24 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाला होता. या जोडप्याचा साखरपुडा झाला होता, तर लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. फोटो काढताना विहिरीतील पायरीच्या कठड्यावर बसलेल्या तरुणीचा तोल जाऊन ती पाण्यात पडली होती.

संबंधित बातम्या :

सेल्फी काढण्याचा नाद जीवावर, वर्ध्यात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

सेल्फीच्या नादात जोडपं विहिरीत पडलं, लग्नाच्या तोंडावर तरुणीचा मृत्यू

(Solapur Ujani River Boat Overturned Father Son Dies)