
Manikrao Kokate will be Arrested Today: राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना दणका दिला आहे. सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचीही निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटेंविरोधात आज दिवसभरात अटक वॉरंट निघण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने मंत्री कोकाटे यांना 2 वर्षे कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. कोकाटे यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. पण सत्र न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळत प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर अटक वॉरंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावर थोड्या वेळात सुनावणी होऊन निकाल समोर येईल.
काय आहे ते प्रकरण?
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात येणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज तयार करुन घश्यात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात कोकाटे आणि त्यांचे बंधु विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारवास आणि 50 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. याप्रकरणी दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी या शिक्षेला सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. माजी मंत्री दिघोळे यांची कन्या ॲड.अंजली दिघोळे-राठोड यांनी हस्तक्षेप याचिकाही दाखल केली होती.
कोकाटेंची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री कॅबिनेटच्या बैठकीत माणिकराव कोकाटे हे अनुपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान कोकाटे यांच्या प्रकरणात अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यात कोकाटेंची खाती कुणाला द्यायची, ते सांगा? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना विचारल्याचे समजते. या प्रकरणात हायकोर्टाने स्थगिती दिली, तरच कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते. पण, तसे न झाल्यास कोकाटेंचे खाते कुणाला द्यायचे, ते सांगा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरील भेटीत अजितदादांना विचारल्याची माहिती समोर येत आहे.
अटक वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करावी यासंदर्भात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहेत. माणिकराव कोकाटे हे कॅबिनेटच्या बैठकीसाठी गैरहजर राहणार असल्याचे समजते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा संदर्भात अजित पवार काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहेत.
रोहित पवारांचा सणसणीत टोला
माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? असा सवाल आमदार रोहित पवारांनी विचारला.
माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025
गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.