‘भारत बंद’ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद

'भारत बंद'ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील अनेक APMC मार्केट, आडत बंद राहणार आहेत.

सागर जोशी

|

Dec 08, 2020 | 8:37 AM

मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील अनेक APMC मार्केट, आडत बंद राहणार आहेत. अनेक रिक्षा संघटना, ट्रक चालक-मालक संघटनाही या बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे रस्ते आणि माल वाहतुकीवरही या बंदचा परिणाम पहायला मिळत आहे. (Statewide response to farmers Bharat Band)

बुलडाण्यात स्वाभिमानीने रेल्वे रोखली

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर इथं रोखून धरली. त्यावेळी पोलिस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारनं तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाण्यात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये कडकडीत बंद

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई APMC मार्केटमध्ये कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. APMCमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांसह माथाडी कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटली

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे. फळी आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांचीच आवक आज झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोज किमान 900 गाड्यांमधून इथं फळं आणि भाजीपाला येत असतो. त्यामुळे बाजार समितीमध्ये आज गर्दी पाहायला मिळत नाही. बाजार समितीमधील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. या बंदमध्ये हमालही सहभागी झाल्यामुळे मार्केटमध्ये शांतता दिसून येत आहे.

महाराष्ट्रात क्रमांक दोन वर असलेली पुण्याजवळील चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती ही कडकडीत बंद आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत बंदची हाक देण्यात आलीये. त्याअनुषंगाने शेतकरी, व्यापारी आणि आडत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आज दोन कोटींची उलाढाल ठप्प असणार आहे.

दादरमध्ये सर्व मार्केट सुरु

दादरमध्ये सर्वकाही सुरुळीत सुरु असल्याचं चित्र आज सकाळी पाहायला मिळालं. दादरमधील भाजी मंडई, फुल मार्केट सुरु आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर टॅक्सी आणि बसेसचा राबताही पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त दादर परिसरात दिसत आहे.

नागपुरातील कळमना धान्य मार्केट बंद, भाजी विक्री सुरु

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला नागपुरातही प्रतिसाद मिळतोय. कळमना मार्केटमधील धान्य व्यापाऱ्यांनीही आजच्या भारत बंदचं समर्थन केलं आहे. त्यामुळे कळमना धान्य मार्केट आज बंद असणार आहे. या ठिकाणी आज कुठलेही लिलाव होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या समर्थनात आज 11 वाजता धान्य व्यापारी रॅलीही काढणार आहे. कळमना धान्य मार्केट आज बंद असलं तरी भाजीपाला मार्केट मात्र सुरु आहे. काही शेतकरी या ठिकाणी भाजी घेऊन आले आहेत. त्यामुळे इथं भाजीपाल्याची विक्री होताना पाहायला मिळत आहे. भाजी खरेदीसाठी व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सोलापुरात भुसार-आडतीवरील लिलाव बंद

सोलापूरमध्ये भुसार मार्केट आज बंद आहे. त्याचबरोबर आडतही बंद ठेवण्यात आली असून सगळे लिलाव आज बंद आहे. श्रमजीवी संघटनेच्यावतीनं आज मोर्चा काढण्यात येणार आहे. आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनानं घेतलाय. तर लालबावटा रिक्षाचालक संघटनाही रिक्षा वाहतूक बंद ठेवणार आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व 14 विडी कारखानेही आज बंद राहणार आहे. यंत्रमाग संघाने मात्र या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सोलापुरात भन्नाट घोषवाक्य!

भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी समाज माध्यमांमध्ये आज भन्नाट घोषवाक्य फिरताना पाहायला मिळत आहेत. त्यात ‘7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा’, ‘वावर हाय तर पावर हाय’ अशा घोषवाक्यांचा समावेश आहे. समाजमाध्यमांवर अशी घोषवाक्य टाकून नागरिकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्याला विरोध; राजू शेट्टींची भूमिका विसंगत? राजकीय फायद्याचा जुगाड?

कृषी कायद्यावरुन भाजप Vs पवार, पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत फडणवीसांकडून घेरण्याचा प्रयत्न

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

Statewide response to farmers Bharat Band

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें