Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी युवकानं उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांकडून रास्ता रोको, काय घडलं?
Maratha Reservation : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुनीलने मराठा आरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी दावा केला आहे.

लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या सुमठाणा इथं एका युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सुनील बिरादार ( वय 42) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवल्याचा दावा, मयत सुनील बिरादार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने संतापलेल्या नातेवाईक आणि मराठा आंदोलकांनी मृतदेह उदगीर ते लातूर रस्त्यावरच्या येरोळमोड येथे रस्त्यावर आणून ठेवत रास्तारोको केला आहे.
आत्महत्या केलेल्या सुनील बिरादार यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, तसे लेखी पत्र द्या, अशी मागणी नातेवाइकांसह आंदोलकांनी केली आहे. याघटनेमुळे सध्या येरोळमोड या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, सरकारकडून देण्यात येणारी कुणबी जात प्रमाणपत्रे पडताळणीत अवैध ठरत असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, 10 ते 17सप्टेंबरदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार पुढाकार घेत आहे. मात्र, काही लोक मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी मुद्दाम आंदोलनाची भाषा करीत असतील, तर ते चुकीचे आहे, असे विखे पाटील म्हणाले.
गेल्या 11 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे त्यांचं उपोषण सुरूच आहे. या दरम्यान सरकारी शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच त्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जोपर्यंत समाधानकारक निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.
