विलीनीकरण नाहीच, जर झाले तर….राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी रोहित पवारांनी कोणत्या अटी ठेवल्या?
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. आता रोहित पवार यांनी आपली भूमिका याबाबत पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील राजकीय घडामोडी, एमपीएससी पेपरफुटी प्रकरण आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे गुजरातला होणारे स्थलांतर यांवरून भाजपप्रणित महायुतीवर सरकारवर घणाघाती टीका केली. अजित पवार गटाच्या महायुतीतील भविष्याबद्दल आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर रोहित पवारांनी मोठे वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर रोहित पवार यांनी आपलं स्पष्ट म्हणणं मांडलं आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘मी पुरावे दिले होते. कुठेतरी एक प्रयत्न प्रफुलची पटेल यांनी केला होता. सुनील तटकरे आणि त्यांचा पक्षावर ताबा आणण्याचा प्रयत्न होता. हे पुरावे मी पूर्वी दिले होते. तो विषय पुन्हा एकदा चर्चेत आणून काय फायदा होईल असं वाटत नाही. मुद्दा इतकाच आहे की त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष कधीच एकत्र येणार नाही. जिथपर्यं ते भाजपाची साथ सोडत नाहीत. ‘
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर रोहित पवार काय म्हणाले?
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भीमनवार यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. इतकंच काय तर भीमनवार यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत परिवहन आयुक्त म्हणून त्यांच्या पूर्वीच्या काळातील कारभारादरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहारांची मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात काढलेल्या मोर्चानंतर सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या टीकेलाही रोहित पवारांनी चोख उत्तर दिले. मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आवाज उठवला, तेव्हापासून भाजपचे लोक माझ्यावर टीका करत असल्याचा आरोप केला आहे.
भाजपावर टीकास्त्र सोडलं
‘भविष्यात सरकार येणार नाही, त्यामुळे गुजरातमध्ये वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न सुर आहेत’, असा घणाघाती टीका रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर रोहित पवारांनी टीकास्त्र सोडलं आहे.
