Bird Flu | राज्यात बर्ड फ्ल्यूचं संकट; चिकन-अंडी खाणाऱ्यांसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांचा मोलाचा सल्ला

Bird Flu | राज्यात बर्ड फ्ल्यूचं संकट; चिकन-अंडी खाणाऱ्यांसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांचा मोलाचा सल्ला
सुनील केदार

महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. (sunil kedar statement on bird flu in maharashtra)

भीमराव गवळी

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 11, 2021 | 11:39 AM

नागपूर: महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. चिकन, अंडी खाणार असाल तर 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. तसेच बर्ड फ्ल्यू बाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (sunil kedar statement on bird flu in maharashtra)

सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला दिला. राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. फक्त 70 ते 80 डिग्री तापमानावर अर्धा तास चिकन- अंडी शिजवा आणि त्यानंतर खा. अर्धा तास चिकन- अंडी शिजवल्यास त्यातील जीवाणू मरून जातात. हे मी सांगत नाही तर संशोधनातून तसं सिद्ध झालं आहे, असं केदार यांनी सांगितलं.

अफवा पसरवल्यास गुन्हा

बर्ड फ्ल्यूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. कोरोना संकटाच्या काळात चिकनमधून कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी सरकारने गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती, असंही त्यांनी सांगितलं.

मुरुंबातून बाहेर जाण्यास मज्जाव

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या दगावल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्या विभागातून कोंबड्या बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या गावातील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना बाहेर जाता येईल. तसेच बाहेरच्या लोकांनाही या गावात येण्यास मनाई करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ठाणे, दापोलीतील सँपल पाठवले

राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचं निदान झालं आहे. ठाणे आणि दापोलीतील कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट यायचे आहेत. रिपोर्ट आल्यावर योग्य कारणांचं निदान होईल, असंही त्यांनी सांगितलं.

पोल्ट्री व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही

राज्याने 2006मध्येही बर्ड फ्ल्यूचं संकट पाहिलं होतं. त्यावेळीही राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत केली होती. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ही अर्थ व्यवस्था डबघाईला जाऊ देणार नाही. पोल्ट्री व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री उद्योगाला हात देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. (sunil kedar statement on bird flu in maharashtra)

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

परभणीतील बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 5 वाजता एक बैठक बोलावली आहे. त्यात मुख्यमंत्री काही निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

राज्याला प्रयोगशाळा हवी

बर्ड फ्ल्यूचं निदान करण्याची प्रयोगशाळा महाराष्ट्रात आहे. पण केंद्राने या प्रयोगशाळेला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भोपाळला नमुने पाठवले जात आहेत. कोरोना संकट काळात लॅब उघडण्यासाठी जशी केंद्राने परवानगी दिली होती, तशीच परवानगी आता बर्ड फ्ल्यूचं निदान करण्यासाठी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. (sunil kedar statement on bird flu in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

(sunil kedar statement on bird flu in maharashtra)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें