युगेंद्र पवार यांना हळद लागली, सुप्रिया सुळेंनी पोस्ट केला फोटो, अजितदादा लग्नाला हजेरी लावणार का?
पवार कुटुंबातील युगेंद्र पवार यांचा 30 नोव्हेंबर रोजी विवाह होणार आहे. त्याआधी हळदी समारंभाचा उत्साह पाहायला मिळाला. सुप्रिया सुळेंनी याच हळदी समारंभातील एक फोटो पोस्ट केला आहे.

Yugendra Pawar Marriage : राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या घराण्यातील खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राला एका नव्या दिशेला घेऊन जाण्याचं मोलाचं कार्य केलेलं आहे. आजघडीला शरद पवार यांच्या राजकारणाचा हाच वारसा त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चालवत आहेत. सध्या या घराण्यात अनेक राजकीय मतभेद निर्माण झालेले आहेत. हे मतभेद असले तरीही कौटुंबिक कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळतात. सध्या पवार कुटुंबातील एका विवाहसोहळ्याची सगळीकडे चर्चा होत आहे. पवार कुटुंबात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांचा विवाह होत आहे. याच विवाह सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबातील सदस्य एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. आता अजित पवार या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का? असे विचारले जात आहे.
युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा 30 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी पवार कुटुंब तसेच इतर नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबर रोजीच्या विवाहसोहळ्याआधी 29 नोव्हेंबर रोजी युगेंद्र पवार यांचा हळदी समारंभ पार पडला. याच कार्यक्रमातील एक फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे युगेंद्र पवार यांना हळद लावताना दिसत आहेत. यावेळी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांनी या विवाह सोहळ्याचे अन्य काही नातेवाईकांसोबतचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
अजित पवार विवाह सोहळ्याला येणार का?
घरात कौटुंबिक कार्यक्रम असला की पवार कुटुंबीय आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र येताना दिसतात. अजित पवार यांनी बंड करून वेगळी चूल मांडल्यानंतरदेखील अनेकवेळा अजित पवार, शरद पवार कौटुंबिक तसेच राजकीय कार्यक्रमात एकत्र दिसलेले आहेत. परंतु युगेंद्र पवार यांनी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत बारामती या मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निडवणुकीत अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे एका प्रकारे प्रतिस्पर्धी मानले जातात. दुसरीकडे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवार हे या निवडणुकीत जोमात प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे अजित पवार युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का? असे विचारले जात आहे. अर्थात या प्रश्नाचे उत्तर 30 नोव्हेंबर रोजी मिळणारच आहे. तत्पूर्वी या विवाहाची राज्यभरात चर्चा होत आहे, हे मात्र नक्की.
