Raj-Uddhav Thackrey : राज आणि उद्धव ठाकरे सभा का घेत नाहीत?, संजय राऊत यांचं थेट उत्तर काय ?
महापालिका निवडणुकांत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा नसल्याने तर्कवितर्क सुरू आहेत. संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, सभा घेण्याची रणनिती ठरलेली असून लवकरच सभा सुरू होतील. मुंबईत एकच भव्य सभा घेण्याचे नियोजन आहे. तसेच, राज-उद्धव यांची संयुक्त मुलाखतही आयोजित केली आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांचा धडाका सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. अनेक ठिकाणी सभा होत आहेत. आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. तसेच विकास कामांची माहिती देत आपल्याच उमदेवारांना निवडून देण्याचं आवाहनही केलं जात आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाने बाजी मारली आहे. तर प्रचारात राज ठाकरे (Raj Thackrey) आणि उद्धव ठाकरे Uddhav Thackrey) कुठे दिसत नाहीयेत. त्यांच्या सभाही होताना दिसत नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना डिवचले असता, राऊत यांनी थेट उत्तर दिलं. सभा न घेण्या मागचं कारणही सांगितलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सभांवरही भाष्य केलं. सभा कशा करता व्हायला पाहिजे ? आमच्या सभा होत नाहीत म्हणून कोण काय चर्चा करतंय त्यावर प्रश्न घेऊ नका. सभा कधी घ्यायच्या याचं गणित आणि मांडणी आम्ही केली आहे. 9 तारखेला पहिली सभा नाशिकला होत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरला जाणार आहेत. सभा कधी घ्यायच्या? कशा घ्यायच्या हे आम्हाला माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबईत एकच अतिविराट सभा
मुंबईत मैदान अडून ठेवलं आहे. तो वाद सुरू आहे. मुंबईत मनसे आणि शिवसेनेला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूने मैदानावर दगड ठेवले आहेत. उगाचच सभा घेण्यापेक्षा शाखांपर्यंत पोहोचावं, अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं धोरण आहे. मुंबईत एकच अतिविराट सभा घ्यावी यावर आमचं एकमत आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
राजकीय प्रश्न नाहीच..
आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत होत आहे. ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुलाखत घेतली जाणार आहे. त्या ठिकाणी सेट उभारले जात आहेत. भव्य सेट आहे. ती तयारी सुरू आहे. दोन नेते एकत्र येत आहेत. आम्ही असं ठरवलंय की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबतच या दोन्ही नेत्यांशी चर्चा करू. राजकारणाचे प्रश्न विचारायला भरपूर वेळ आहे. मुंबई महाराष्ट्राला काय देणार ही सकारात्मक आणि विधायक चर्चा करणार आहोत. महेश मांजरेकर मोठे कलाकार असले तरी ते मुंबईकर म्हणून मुलाखतीला बसणार आहेत. मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याबाबत ते प्रश्न विचारणार आहेत, असंही ते म्हणाले.
शिंदेंना कोरोना झालाच नव्हता
यावेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना कोरोना झालाच नव्हता असा दावा त्यांनी केला आहे. कोरोना झाल्याचं एकनाथ शिंदेंनी नाटक केलं होतं. बनावट रिपोर्ट तयार केले होते. पीपीई कीट घालून बेडवर बसून सह्या करत होते. आम्ही सत्तेत होतो. आम्हाला माहीत आहे. उद्धव ठाकरेंनी काय केलं याची जगाने दखल घेतली. जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. त्या आरोग्य संघटनेत तर शिवसैनिक नव्हते ना? मोदींनी कौतुक केलंय स्वत:.. हे काय सांगत आहेत? अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.
