महापालिका निवडणुकांपूर्वी ठाणेकरांसाठी गुडन्यूज, एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा
ठाणे महानगरपालिकेच्या 31 व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबई-ठाणे किनारी रस्त्याची घोषणा, मेट्रोच्या ट्रायल रन आणि वर्षाच्या अखेरीपर्यंत नागरिकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती, तसेच अंतर्गत मेट्रोला केंद्राची मंजुरी मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज 31 व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मॅरेथॉन ठाण्याची… उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंसह तब्बल 20 हजारांहून अधिक स्पर्धकांनी उत्साहात भाग घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जोरदार भाषण केले. या भाषणावेळी एकनाथ शिंदे यांनी मुंबईपासून थेट ठाण्यापर्यंत कोस्टल रोड तयार करण्याची मोठी घोषणा केली. यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीची जुनी समस्या लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईपासून थेट ठाण्यापर्यंत कोस्टल रोड
“ठाण्यातील वाहतूक कोंडी हा देखील विषय मार्गी लावत आहे. मेट्रोचाही निश्चित फायदा होईल. मुंबईपासून थेट ठाण्यापर्यंत कोस्टल रोड करत आहोत. ठाण्यातून खाडी साकेतमार्गे गायमुखवरुन फाऊंटनकडे जाणार आहे. तिथून थेट मीरा भाईंदरजवळून थेट अहमदाबाद महामार्गाला जोडले जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी बाहेरून जाणार आहे. हा देखील आपल्या ठाण्यासाठी मोठा प्रकल्प ठरेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री असताना मी 3000 कोटी रुपयांचा निधी दिला
त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मेट्रो लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. सप्टेंबरमध्ये मेट्रोची ट्रायल रन सुरू होईल आणि वर्षाच्या अखेरीस ती नागरिकांसाठी सुरू होईल. तसेच ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पालाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ठाण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून विकास होत आहे. रस्ते रुंदीकरण, मोठी उद्याने, आणि गायमुख येथील चौपाटीसारख्या प्रकल्प सुरु आहेत. ठाण्यासाठी मुख्यमंत्री असताना विविध प्रकल्पांसाठी मी 3000 कोटी रुपयांचा निधी दिला, अशी माहिती त्यांनी दिली.
ठाण्याच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये जावे
तसेच जुन्या गडकरी रंगायतनचे नूतनीकरण पूर्ण झाले असून येत्या 15 ऑगस्ट रोजी ते पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच खेळासाठी पैशांची कमतरता पडू दिली जाणार नाही. ठाण्याच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये जावे, अशी माझी इच्छा आहे. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळाडूंना मिळत असलेल्या प्रोत्साहनाचे कौतुक केले. मॅरेथॉन स्पर्धकांनी आरोग्यासाठी, ठाण्यासाठी, देशासाठी धावा असा संदेशही त्यांनी दिला. याप्रसंगी बोलताना त्यांनी वर्षा मॅरेथॉनचे संस्थापक दिवंगत सतीश प्रधान यांची आठवण काढली. तसेच, ‘खड्डेमुक्त ठाणे, हरित ठाणे आणि तलावांचे ठाणे’ हे उद्दिष्ट जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
