बदलापूरचे बाप्पा निघाले दुबईला, जगभरातून मागणी वाढली, मूर्तीकार, विक्रेत्यांना “अच्छे दिन”
कोरोनाचा कहर कमी झाल्याने जग हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे मूर्तीकारही पुन्हा नव्यानं उभे राहत आहेत. यंदा बदलापूरचे गणपती बाप्पा (Ganpati) दुबईला रवाना झालेत.

ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) जगाला हैराण करून सोडले होते. त्यात अनेक व्यवसाय बंद झाले. कित्येक व्यवसाय कर्जात डुबले. यात मूर्तीकारांचेही मोठे नुकसान झाले. मूर्तीकार (Sculptor) आणि विक्रेत्यांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली होती. सततचे लॉकडाऊन आणि सणांवरील निर्बंध (Ganpati Festival) यामुळे मूर्तीकारांचा व्यवसाई डबघाईला आला होता. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, अशा लाटांनी सर्वांना हैराण करून सोडलं होतं. मात्र आता थोडी उसंत मिळाली आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्याने जग हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे मूर्तीकारही पुन्हा नव्यानं उभे राहत आहेत. यंदा बदलापूरचे गणपती बाप्पा (Ganpati) दुबईला रवाना झालेत. यंदा परदेशात मागणी वाढल्यानं गणपती बाप्पांच्या या परदेशी प्रवासाला मार्च महिन्यातच सुरुवात झालीये.
परदेशातून मूर्तींची मागणी वाढली
बदलापूर शहरातील निमेश जनवाड हा तरुण उद्योजक मागील काही वर्षांपासून गणेशमूर्ती निर्यात करतो. मागील वर्षी कोरोनामुळे निर्यात मंदावलेली असतानाही त्याने 20 हजार गणेशमूर्ती विविध देशांमध्ये पाठवल्या होत्या. मात्र यंदा गणेशमूर्तींची मागणी दुपटीने वाढलीये. त्यामुळं यावर्षी मार्च महिन्यापासूनच त्याने गणेशमूर्ती परदेशात पाठवायला सुरुवात केलीये. त्याची पहिली 1 हजार मूर्तींची कन्साईनमेंट दुबई आणि बहारिनसाठी रवाना झाली. जहाजमार्गे या गणेशमूर्ती पुढील काही दिवसात परदेशात दाखल होतील. यासोबतच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, सिंगापूर, युरोप आणि आखाती देशात निमेशच्या गणेशमूर्ती काही दिवसात रवाना होणार आहेत. यामध्ये सर्वच मूर्ती या इको फ्रेंडली असून लाल माती, शाडू आणि कागदाचा लगदा यापासून या मूर्ती तयार करण्यात आल्याची माहिती गणेशमूर्ती निर्यातदार निमेश जनवाड याने दिलीये.
यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात
यंदा मागणी चांगली असल्याने मूर्तीकारांना थोडासा दिलासा मिळत आहे. मागील दोन वर्षात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी मूर्तीकार धडपडत आहेत. किमान यंदा तरी चार पैसे हाती लागण्याची अपेक्षा मूर्तीकार करत आहेत. भारतातही सणांवरील निर्बंध बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलेत. तसेच भारतातली कोरोना रुग्णातही कमालीची घट झालीय. त्यामुळे यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होईल, अशी आशा गणेश भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत.