डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला तरीही राष्ट्रवादी बेफिकीर, कल्याणमधील कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

डोंबिवलीत कालच ओमिक्रॉनचा रुग्ण सापडलेला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसची बेफिकीरी आढळून आली आहे. कल्याण येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला तरीही राष्ट्रवादी बेफिकीर, कल्याणमधील कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
ncp program

कल्याण: डोंबिवलीत कालच ओमिक्रॉनचा रुग्ण सापडलेला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसची बेफिकीरी आढळून आली आहे. कल्याण येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. या कार्यक्रमात कार्यकर्ते एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यांच्यात कोणतंही अंतर नव्हतं. त्यांच्या तोंडाला मास्कही नव्हतं. विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोरच कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज कल्याणमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयास भेट दिली. या दरम्यान मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. रुपाली चाकणकर यांनी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र या कार्यक्रमा दरम्यान बहुतांश महिलांच्या तोंडावर मास्क नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. पण इकडे मात्र, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कार्यक्रमातच नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. याविषयी चाकणकर यांना विचारले असता त्यांनीही अनेकांनी मास्क लावले नसल्याची कबुली दिली आहे. आम्ही मास्क घातला आहे. पण अनेकांनी मास्क घातला नव्हता. त्याना कडक सूचना दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

12 मिनिटात पोलिसांची मदत मिळणार

शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागात 112 हा हेल्पलाईन नंबर महिलांसाठी सुरु करण्यात आला आहे. महिलांना कोणताही त्रास असल्यास महिलांनी या नंबरवर संपर्क साधावा. 12 ते 14 मिनिटात पोलीस त्यांच्या मदतीसाठी पोहचतील, असं चाकणकर यांनी सांगितले.

बालविवाह झाल्यास सरपंचावरही गुन्हा

यावेळी त्यांनी बालविवाहावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. एकट्या सोलापूरमध्ये गेल्या वर्षभरात 105 बालविवाह रोखण्यात आले आहेत. नोंद नसलेले, माहीत नसलेले जवळपास 450 ते 500 बालविवाह एका जिल्ह्याच्या ठिकाणी होतात हे दुर्दैवी आहे. यामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण देखील मोठं असल्याचं त्या म्हणाल्या. लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढल्याशिवाय बाल विवाह रोखले जाणार नाहीत. लग्न करुन देणारे आई-वडील आणि लग्न करुन घेणारे आई-वडील, भटजी, फोटाग्राफर आणि मंगल कार्यालयांवर आतापर्यंत गुन्हे दाखल केले जात होते. आता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बालविवाह केला जाईल. त्याची नोंद करणाऱ्या रजिस्टर आणि सरपंच यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा. अशी शिफारस राज्य सरकारकडे आयोगाकडून केली गेली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

रुग्णालयांना अचानक भेट देणार

राष्ट्रवादीच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी भिवंडी, कल्याण, डोंबिवली व अन्य ठिकाणी सरकारी रुग्णालयाची दुरवस्था असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर, ज्या रुग्णालयात दुरवस्था आहे. त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट केली जाईल. समस्या जाणून घेतल्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सांगून सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.

शक्ती विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकते

येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक मंजूर केला जावा यासाठी महिला आयोगाकडून पाठपुरावा सुरू आहे. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर केले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Girish kuber : हे लिहिल्यामुळे गिरीश कुबेरांवर नाशकात शाईफेक, काय होता मजकूर? वाचा सविस्तर

Ramdas Athawale: मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यावर मार्चमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळेल, रामदास आठवलेंचं भाकीत

कुबेरांच्या ‘रेनेसान्स स्टेट: द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडची पुन्हा मागणी

Published On - 6:11 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI