लग्नासाठी गेली अन् शरीराची फरफट झाली; डोंबिवलीच्या विराली मोदी हिच्यासोबत नेमकं काय घडलं?
एक तरुणी आपल्या विवाहाच्या नोंदणीसाठी गेली. पण तिला प्रशासनामुळे काही अडचणी आल्या. या अडचणी खरंतर खूप सामान्य आहेत. पण त्या सरकारकडून पूर्ण झाल्या नाहीत तर किती त्रास होतो, याचे हे जीवंत उदाहरण आहे. डोंबिवलीच्या विराली मोदी या तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितलाय.

सुनील जाधव, Tv9 मराठी, डोंबिवली | 19 ऑक्टोबर 2023 : मुंबईतील खार परिसरातल्या विवाह नोंदणी कार्यालयात लिफ्ट नसल्याने डोंबिवलीत राहणाऱ्या दिव्यांग तरुणीला होणाऱ्या नवऱ्यासह नातेवाईकाच्या मदतीने तब्बल दोन मजले चढून जावे लागले. विकसित भारत असून शासकीय इमारतीत वयोवृद्धांसाठी आणि दिव्यांगणासाठी निधी असून सुविधा का नाही? असा सवाल या तरुणीने केलाय. शासनाच्या विरोधात तरुणीने आपली व्यथा मांडत लवकरच न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असा निर्धार केलाय,
इंडिया विल चेअर स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकवणारी आणि दिव्यांग व्यक्तींना मोटिवेशन करणाऱ्या डोंबिवलीतील एका दिव्यांग तरुणीला मुंबईतील विवाह नोंदणी केंद्रात लिफ्ट नसल्याने होणाऱ्या नवऱ्यासह नातेवाईकाच्या मदतीने तब्बल दोन मजले चढून जावे लागल्याची घटना घडली. याबाबत पीडित तरुणी विराली मोदी हिने खंत व्यक्त करत शासनाच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा दिला आहे.
वयाच्या 15 व्या वर्षी अपंगत्व
डोंबिवलीमधील लोढा पलावा परिसरात राहणाऱ्या विराली मोदी यांना वयाच्या 15 व्या वर्षी एका गंभीर आजाराने ग्रासलं. या आजारामुळे त्यांचे दोन्ही पाय अपंग झाले. या पायांची हालचाल होत नाही. विराली या अशा परिस्थितीत आपल्या आयुष्याबरोबर लढा देत आहेत. याचबरोबर इतर दिव्यांगांना आपले हातपाय नसल्याची खंत वाटू नये यासाठी विरली यांनी दिव्यांगांचे मोटिवेशन सेशन करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर इंडिया विल चेअर स्पर्धेत सहभाग घेऊन दुसरा क्रमांकही पटकावला.
विवाह नोंदणी कार्यालयात विराली यांची गैरसोय
नेहमी आपलं अपंगत्व बाजूला ठेवून समाजासाठी काय करता येईल यासाठी धाव घेत असलेल्या विरालीला आपल्या स्वतःच्या लग्नात विवाह नोंदणीसाठी विवाह नोंदणी केंद्रात लिफ्ट नसल्याने होणाऱ्या नवऱ्यासह नातेवाईकाच्या मदतीने तब्बल दोन मजले चढून जावे लागल्याची खंत व्यक्त करावी लागली आहे. 16 ऑक्टोंबर म्हणजे दोन दिवसांपूर्वी विरलीचं लग्न मुंबईतील खार परिसरातल्या विवाह नोंदणी कार्यालयात होतं.
विराली आपल्या नातेवाईकांसह विवाह नोंदणी कार्यालयात पोहचली. विरालीने अपंग असल्याची कल्पना संबंधित एजंट्स तसेच अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र विवाह नोंदणी कार्यालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असून इमारतीला जाण्यासाठी लिफ्ट किंवा अन्य सुविधा नव्हती. यावेळी तिचा होणारा नवरा क्षितिज नाईक आणि त्याच्या नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्याला विवाह नोंदणीसाठी लागणारी सही ही खाली येऊन घ्यावी, अशी विनंती केली.
अधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवली नाही
मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी असे होत नसल्याचे सांगत विरलीलाच वरती येण्यास सांगितले. यानंतर तिचा होणारा नवरा क्षितिज आणि तिच्या नातेवाईकांनी विरालीला पकडून तब्बल दोन मजलेवर उचलत नेले. विशेष म्हणजे ही इमारत जुनी असल्याने या इमारतीच्या पायऱ्या उंच असून जिन्यामध्ये काही भाग हालतही होता. एका अर्थाने मनात भीती बाळगत तिच्या नातेवाईकाने तिला कसंतरी विवाह नोंदणी केंद्रापर्यंत नेलं.
विराली न्यायासाठी लढणार
विरालीने त्या ठिकाणी आपली विवाहाची नोंदणी केली. मात्र तिला या नोंदणी केंद्रामध्ये चढताना आणि उतरताना झालेला त्रास मनात ठेवून तिने आता शासकीय इमारतीत लीप लावावी, अशी मागणी केलीय. तिने सरकारच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. ती लवकरच याबाबत न्यायालयाचा दरवाजा ठोकवणार असून आपल्या न्यायासाठी आणि हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे तिने सांगितलं आहे.
