ठाणेकरांनो, घोडबंदर रोडवरील वाहतूकीत बदल जाणून घ्या, मगच रविवारी घराबाहेर पडा
घोडबंदर रोडवरील वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावर रस्त्याचे काम हाती घेतल्याने सर्वसामान्यांना पर्यायी मार्गाने वाहने नेण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. काय हे नियोजन पाहा....

वाहतुक कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांना रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहतूक बदलाच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतुक उपविभागाच्या हद्दीत ठाणे घोडबंदर राज्य मार्ग ८४ या मार्गावर गायमुख नीराकेंद्र, काजूपाडा ते फाउंटन हॉटेल पर्यंत ग्राऊटींगचे आणि मास्टिक असफाल्टचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे उद्या रविवारी ७ डिसेंबर रात्री ००.०१ ते २३:५९ वाजेपर्यंत काम करण्यात येणार आहे.त्यामुळे या परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबतची अधिसुचना जारी केली आहे.मात्र पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही अधिसुचना लागू राहणार नाही.
एम. व्ही. ए.-११६/सीआर/३७/टीआर, दि. २७/०९/१९९६ चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ) (व) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुढीलप्रमाणे अधिसूचना जारी करीत आहे.
प्रवेश बंद –
१) मुबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापुरबावडी जंक्शन येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे
पर्यायी मार्ग
अ) मुबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहने ही वाय जक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद –
ब) मुबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहने ही कापुरबावडी जंक्शन जवळुन उजवी कडे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व वाहने खारेगाव खाडी ब्रिजखालुन, खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद –
३) नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे सर्व जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड अवजड वाहने ही मानकोली ब्रिज खालुन, उजवी कडे वळण घेऊन अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
हलक्या वाहनांसाठी
गायमुख घाटात ठाणे घोडबंदर वाहीनीवर काम चालु असताना ठाणे कडुन घोडबंदर च्या दिशेने जाणारी हलक्या वाहने गायमुख चौकी पासुन घोडबंदर ठाणे वाहिनीवर राँग साइडने जावुन पुढे फाउंटन हॉटेल समोरील कट मधुन ईच्छित स्थळी जातील.
