सोन्याची अंगठी असो की आयफोन… चुकून जरी दानपेटीत पडला तर देवाचा… तुळजाभवानी मंदिर संस्थानचा वादग्रस्त ठराव; भाविक संतापले
तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न देण्याच्या वादग्रस्त ठरावाने भाविक संतप्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील एका भाविकाची सोन्याची अंगठी परत न मिळाल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा ठराव तात्काळ रद्द करून भाविकांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनसाठी येतात. कोणी देवीचरणी डोकं ठेवतो, तर कोणी काही अर्पण करतो. अनेक जण मंदिराच्या दनपेटीत यथाशक्ती दान अर्पण करतात. मात्र आता याच तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा एक निर्णय वादग्रस्त ठरताना दिसत असून त्यामुळे भाविक प्रचंड संतापले आहेत. दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही असा निर्णय संस्थानाने घेतला आहे. मौल्यवान वस्तू परत न करण्याचा हा ठराव नेमका काय आहे, आणि एका भाविकाला याचा कसा फटका बसला याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
नक्की काय घडलं ?
एखादी व्यक्ती देवळात जाते तेव्हा मनात श्रद्धा असते, विश्वास असतो. पण तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ठरावामुळे आज हाच विश्वास डगमगताना दिसतोय. दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तूही परत दिली जाणार नाही, ती दानच समजली जाईल असा वादग्रस्त आणि संतापजनक ठराव मंदिर संस्थानने केला आहे. आणि या ठरावाचा मोठा फटका पिंपरी-चिंचवड येथील भाविक सुरज टिंगरे यांना बसला आहे.
सुरजे हे तुळजापूर येथील मंदिरात देवीच्या दर्शनााठी आले होते, तेव्हा दानपेटीत पैसे टाकताना चुकून त्यांची सुमारे एक तोळ्याची सोन्याची अंगठी दानपेटीत पडली. हे लक्षात येताच टिंगरे यांनी तत्काळ मंदिर प्रशासनाशी संपर्क साधत अंगठी परत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. दानपेटीत जी अगंठी पडली तिचा फोटो, कोणत्या दानपेटीत,कधी पडली याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच सत्यता पडताळून अंगठी परत मिळावी यासाठी त्यांनी मंदिर संस्थानकडे लेखी अर्जही सादर केला. मात्र, दोन महिने उलटूनही अंगठी परत न करता मंदिर संस्थानने त्यांचा अर्ज निकाली काढला.
संस्थानाचा वादग्रस्त निर्णय, भाविक संतापले
त्याबाबत विचारणा केली असता, मंदिर संस्थानाच्या ठरावानुसार या मंदिरातील दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू परत देता येणार नाही, असे लेखी उत्तर सुरज टिंगरे यांना देण्यात आले. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. या निर्णयामुळे भावक अतिशय संतापले असून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप होत आहे. तुळजाभवानी देवीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्या भाविकांवर अशा प्रकारचे संकट ओढवणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मंदिर संस्थानने हा ठराव तात्काळ रद्द करावा आणि संबंधित भाविकाला न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पुजारी मंडळ देखील मैदानात उतरल आहे.
भाविकांना न्याय मिळणार का ?
श्रद्धा आणि विश्वासाच्या नावाखाली भाविक देवाच्या दरबारात येतो. मात्र,तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या या ठरावामुळे आज भाविकच असुरक्षित झाल्याचं चित्र आहे. चूक अनवधानाने झाली असताना ही सत्य काय ते स्पष्ट असूनही न्याय न मिळणं, हे श्रद्धेचं नव्हे तर व्यवस्थेचा अपयश ठरत आहे. देवीच्या दरबारात आलेल्या भाविकाला न्याय मिळणार की ठरावाच्या नावाखाली त्याची फसवणूक होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मंदिर संस्थान आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करणार का, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.
आधीही घडला होता असा प्रकार, चक्क आयफोनच दानपेटीत
यापूर्वी मंदिराचत्या पेटीत मौल्यवान वस्तू पडल्याचे आणि ती परत न मिळाल्याचा प्रकार घडला होता. तामिळनाडूतील तिरुपोरूरमधील अरुलमिगु कंदास्वामी मंदिरातील ही घटना होती. या मंदिरातील दानपेटीत एका भाविकाचा चुकून आयफोन पडला. त्या भाविकाने तो परत मागितला. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून आता ही ईश्वराची संपत्ती असल्याचे सांगत फोन देण्यास नकार दिला होता.
