
राज्यात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात तणाव वाढत आहे. या मुद्द्यावरुन राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची चाचपणी सुरु आहे. अनेक पदाधिकारी नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. तसेच आज रविवार असल्याने मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकल उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे सहा वाजल्यापासूनच रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना झापलं आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा यासाठी बच्चू कडू यांनी पायदळ यात्रा काढली आहे. उद्या यवतमाळच्या अंबोडा गावात या यात्रेचा समारोप होणार आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
आमच्यासाठी सगळ्या भाषा समान आहेत. जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की कायदा व सुव्यवस्था राज्यात का बिघडते? राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळू शकत नाही, असं काँग्रेस खासदार इमरान प्रतापगाढी यांनी सांगितलं. राहुल गांधी यांचा नारा आहे नफरत छोडो भारत जोडो आमचा कन्याकुमारी ते काश्मीरचा नारा आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळी भाषा आहे राहुल गांधी संपूर्ण देशाला जोडत आहे. देशाचे गृहमंत्री इंग्रजीच्या विरोधात बोलतात पण त्यांची मुलं परदेशात शिकतात त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
साखरी तालुक्यातील पिंपळनेरमध्ये गोमांस तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. 1500 किलो गोमांस जप्त करण्यात आलं असून दोन जणांना अटक केली आहे. पिंपळनेर पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत गोमांस तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला. जप्त केलेल्या गोमांसाची अंदाजित किंमत 2 लाख 25 हजार रुपये आहे. पिंपळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बच्चू कडू यांच्या सात बारा कोरा यात्रेच्या सातव्या दिवशी 120 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. पायदळ यात्रेचा आजचा शेवटचा मुक्काम यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील गुंज गावात आहे. बच्चू कडू यांच्या उद्या होणाऱ्या अंबोड येथील जाहीर सभेसाठी राज्यभरातील शेतकरी अंबोड मध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांच्या उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला जाणार आहे. मागील सात दिवसांपासून बच्चू कडूंची सातबारा कोरा ही पदयात्रा सुरू आहे. उद्या होणार बच्चू कडू यांच्या 138 किलोमीटरच्या पदयात्रेचा टप्पा पूर्ण होईल.
शनिवारी पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील खारान जिल्ह्यात डीआयजी कार्यालयाला लक्ष्य करून अज्ञात हल्लेखोरांनी अनेक स्फोट घडवले. या स्फोटांमुळे परिसरात गोंधळ उडाला आणि मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकामागून एक स्फोट झाल्याने सुरक्षा दलांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलिस आणि सुरक्षा संस्थांचे पथक तैनात करण्यात आले आहे आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. “दोन भाऊ एकत्र आलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे. अजेंडा असो किंवा नसो दोन भाऊ एकत्र येणे हे कुटुंबासाठी चांगली गोष्ट आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
शालिमार एक्सप्रेसमधून गांजा तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तस्कराकडून साडेआठ किलो गांजा जप्त केला आहे. आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी ह कारवाई केली आहे. तस्कर हा गांजा ओडीसातून भिवंडीत घेऊन जात होता.
सायनमध्ये चला मराठी शिकूया या उपक्रमाचे सरस्वती क्लासेस येथे आयोजन करण्यात आले आहे. डॉ दयानंद तिवारी यांनी लोकांना मोफत मराठी शिकवण्याची नवी मोहिम सुरू केली आहे. ते स्वतः प्राध्यापक असून त्यांचे स्वतःचे शिक्षण क्लासेस आहेत. त्यांनी जाहीर केलं आहे की आता या क्लासेसमध्ये इच्छुकांना मराठी पूर्णपणे मोफत शिकवले जाईल.
नागपूरमधील अमरावती रोड वरील नवीन उड्डाणपूल लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. या उड्डाणपूलाच काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर आरटीओपासून वाडी रोडला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाण्यात महिला प्रवासी व रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. या बाचाबाचीत रिक्षा चालकाने महिला प्रवाशावर हात उचलल्याचे समोर आले आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली, यानंतर वाहतूक विभागाने रिक्षा चालकावर कारवाई केली आहे.
नागपुरातील जरीपटका पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यातील समीर गायकवाड सोडता उर्वरित चार अल्पवयीन बालके आहेत. एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींकडून लोखंडी तलवार, चाकू, टॉमी, मिरची पावडर, टॉर्च असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरणानंतर लोकार्पण झाले आहे. नांदेडच्या विकासासाठी डीपी प्लॅन आवश्यक, प्राधिकरण करा अथवा न करा असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजता ‘पिस्तूल खरी की खोटी’ हे दाखविताना गोळी झाडली गेल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील दोन्ही कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती सोमर येतेय. सावंगी येथील भरत विजय घाटगे आणि करण सोमीनाथ भालेराव हे दोघे मित्र समृद्धी महामार्गाच्या सावंगी टोल नाक्यावर काम करत होते.
कल्याण पूर्वकडे एक मोठी घटना घडल्याचं समोर आलं आहे. झोपेत असलेल्या कुटुंबावर घराचे छत कोसळलं आहे. घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे मध्य रात्री दुकानांना आग लागून तीन ते चार दुकानातील साहित्य जळून खाक झाल आहे. हिंगोली वाशिम अग्निशमन दलाच्या वतीने आग वेळीच आटोक्यात आनल्याने मोठा अनर्थ टळला . नेमकी आग कुठल्या कारनाने लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.
मालेगाव : मालेगावमध्ये झाडांचा वाढदिवस साजरा…
इंदूर हैदराबाद महामार्गाचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. सत्तेतील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील जलसमाधी करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवून ठेवले आहे. यावेळी शेतकऱ्यांसह आमदार आणि पोलिसात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. आंदोलनादरम्यान पोलिसात आणि आमदारात मोठा संघर्ष सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आले असून संपूर्ण राज्यभर एक आनंदाचा वातावरण दिसून येत आहे.त्यातच आज भाजप पक्षाकडून वडाळा विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली यावेळी वडाळा विधानसभेचे भाजप पक्षाचे आमदार कालिदास कोळमकर सह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत आरती करून. आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
निलम गोरे यांनी मुंबई महापालिकेत महापौर महायुतीचा होणार असे म्हटले. पुढे त्या म्हणाल्या, ‘लोकांच्या मनावर कृतीचा फरक पडतो ते देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत त्यांच्या बद्दल मी काही बोलणार नाही’
“मुंबईतील लोक जागरूक आहेत. मुंबईतील नागरिकांना, मुंबईतील मतदारांना त्यांचं भविष्य कुठे सुरक्षित आहे हे चांगलंच माहीत आहे. इथं मतदान केल्याने मुंबईचा विकास वेगाने होईल. केंद्रात एनडीएचे सरकार आहे. महाराष्ट्रात महायुती युतीचं सरकार आहे. मुंबईतील लोकांना नक्कीच वाटेल की आपण दुहेरी इंजिनला तिहेरी इंजिनमध्ये रूपांतरित करावं,” अशी प्रतिक्रिया पियुष गोयल यांनी दिली.
“महायुतीचा महापौर महानगरपालिकेत निश्चितच बसेल. उत्तर मुंबईतून ३८ नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य आहे. आगामी बीएमसी निवडणुकीबद्दल उत्तर मुंबई सज्ज आहे,” असं पियुष गोयल म्हणाले.
“डोळे असून दृष्टी नसणारं हे सरकार आहे. त्याचा विरोध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. विळा चालवण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये. काही ठिकाणी नेत्यांचे फोन सुरू झाले आहेत की बच्चू कडू यांच्या यात्रेला जाऊ नका. काही पोलीस पाटलांकडून दबावतंत्र सुरू झालं आहे. उद्याची सभा कशी फेल होईल याचा प्रयत्न सुरू झाला आहे,” असं बच्चू कडू म्हणाले.
“आजच्या बैठकीत बऱ्याच गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. जुना मुंबई-पुणे-बंगळुरू रोडवर उड्डाणपूल बनवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी चौक आणि हिंजवडी चौक परिसरातील समस्या सोडवण्यावर चर्चा झाली. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असं अजित पवार म्हणाले.
इंदूर – हैदराबाद महामार्गाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. आंदोलनात शेतकऱ्यांसह कुटुंबीय मोठ्या प्रमाणात सहभागी असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. जलसमाधी आंदोलनात शिंदे गटाचे स्थानिक आमदारसुद्धा सहभागी झाले आहेत.
कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांच्या डोळ्याला काळ्या पट्ट्या, हातात विळा आणि रूमन घेऊन आंबोड्याच्या दिशेने कुच करत सुरू केला पायदळ प्रवास.. सरकारने डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही प्रतीकात्मक आंदोलन करत आहे…. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.
सकाळ पासून ढगाळ वातावरण होते.. साडे दहा वाजता पावसाने हजेरी लावली आहे… अचानक आलेल्या पावसाने वाहनधारक, नागरिकांची तारांबळ उडाली आहे… पूर्ण परिसरात ढगाळ वातावरण असून, दिवसभर अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे
अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली… खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे… मनोज जरांगे पाटलांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झालीय… लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे प्रणिती शिंदे यांना मोठा फायदा झाला होता… लोकसभेत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रणिती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली
उत्तमनगर परिसरात सिगरेट न दिल्यामुळे संतापलेल्या काही गुंडांनी हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला केला. त्यांनी दुकान फोडून रोख रक्कम चोरी केली. या धक्कादायक घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे….
श्री तुळजाभवानीच्या 1865 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर विकास आराखड्याच्या कामाला आता वेग आला. आराखड्यामध्ये संपादित करण्यात आलेल्या 96 मालमत्ताचे सर्वेक्षण मंदिर संस्थांच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे. पाच पथकाच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरणाच्या द्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले.
महापालिका निवडणुकीपूर्वी, उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज उत्तर मुंबईतील आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होऊ शकते. ही बैठक कांदिवली येथील भाजप जिल्हा कार्यालयात होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पाच मंत्र्यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केले. त्यामध्ये संजय शिरसाट आणि उदय सामंत यांचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे येथील आयटी नगरी हिंजवडीतील नागरी समस्यांची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. हिंजवडी परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, त्याशिवाय चुकीच्या पद्धतीने बांधकामांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बारामती हॉस्टेल येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीला पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रवक्त्या रुपाली पाटील, तसेच माजी नगरसेवक आणि विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, डिझाइन बॉक्स कंपनीचे सीईओ नरेश अरोरा हे देखील या बैठकीला हजर राहणार आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष मारहाणीची घटना समोर आली आहे. लवूळ गावात १२०० रुपयांच्या किरकोळ वादातून ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचे अपहरण केले. या शेतमजुराला वाचवण्यासाठी गेलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना मुकादमांनी आणि त्यांच्या साथीदारांनी अमानुषपणे मारहाण केली. लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रे आणि बंदुकीचा धाक दाखवत सिरसट यांना जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर, त्यांच्याकडील दीड लाख रुपये लुटून तोंडावर लघुशंका करून अत्यंत क्रूर वर्तन करण्यात आले. सिरसट यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी पळ काढला, मात्र पोलिसांनी एका आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पैशासाठी घडलेली ही क्रूर घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी आहे.
पुणे पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी पथकाने हडपसर परिसरात मोठी कारवाई करत ८ लाख रुपयांचा अमली पदार्थ साठा जप्त केला आहे. या छापेमारीत पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी राजस्थान राज्यातून अमली पदार्थांची तस्करी करून पुण्यात त्यांची विक्री करत होते. अटक केलेल्या आरोपींची नावे राकेश अर्जुनदास रामावत, ताराचंद सीताराम जहांगीर, मुसीम सलीम शेख आणि महेश नारायण कळसे अशी आहेत. हे आरोपी पुण्यातील हडपसर आणि खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करत होते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या ‘सातबारा कोरा’ पायदळ यात्रेचा आज सातवा दिवस आहे. उद्या, १४ जुलै २०२५ रोजी, यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावात या यात्रेची जाहीर समारोप सभा होणार आहे. या सभेला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार असून, राज्यभरातील हजारो शेतकरी अंबोडामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांच्या या पदयात्रेने आतापर्यंत १०१ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे, तर पापळ ते चिलगव्हाण असा एकूण १३८ किलोमीटरचा प्रवास या यात्रेत होणार आहे. या यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, तसेच शेतात डवरणी आणि फवारणी करून शेतकऱ्यांच्या कामात सहभाग घेतला.
कल्याण शहरात बेशिस्त टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसेसमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. कल्याण नगर मार्गावरील सुभाष चौक आणि कल्याण भिवंडी मार्गावरील सहजानंद चौक परिसरात खासगी बसेस थेट मुख्य रस्त्यावर उभ्या करून प्रवासी भरत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतूक पोलीस चौकी जवळ असूनही पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना आणि वाहनचालकांना यामुळे अर्धा-अर्धा तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तात्काळ कारवाई करून हे अवैध बस थांबे हटवण्यात यावेत, अशी मागणी करत गणेश पवार या तरुणाने वाहतूक पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलिसांच्या सक्रिय हस्तक्षेपाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.