
गेल्या अनेक दिवसांपासून मंदावलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस असून रत्नागिरीच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत पावसाचा जोर होता. तर आणखी काही दिवस मुंबई महानगर प्रदेशासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा मुक्काम कायम असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी 7 च्या परिषदेत बोलणार आहेत. 14 देशांचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कॅनडामध्ये आज जी 7 परिषद पार पडणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह कॅनडा, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली हे देशसुद्धा सहभागी होणार आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सकी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतही पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संवाद साधण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी हे जी 7 परिषदेत काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागून आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
इस्राईल आणि इराण या दोन देशात युद्ध पेटलं असून तणाव वाढला आहे. इराणमधून 110 भारतीयांचा पहिला गट आर्मेनियाला पोहोचला आहे. हा गट उद्या दिल्लीला येईल.
ऐश्वर्या गौडा फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेते डीके सुरेश यांना समन्स बजावले आहे. ईडीने सुरेश यांना 19 जून रोजी हजर राहून पीएमएलए अंतर्गत त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले आहे.
मान्सून चार ते पाच दिवसापासून सक्रिय झालाय त्यामुळे कोकणात आपल्याला गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. पुढच्या आठ दिवसाचा विचार करता कोकण आणि घाटमाथ्यावर येणारे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात विजेच्या गडगडाचा सह पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.पेरणीसाठी शेतकऱ्याने जमिनीची वापसा झालेली परिस्थिती आणि जमिनीतला ओलावा याचा विचार करावा. कृषी विभागाकडून ज्या काही सूचना शेतकऱ्यांना प्राप्त होत आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, एस डी सानप (हवामान शास्त्रज्ञ पुणे वेधशाळा) यांनी सांगितलं.
एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला, ज्यामुळे दिल्लीहून पॅरिसला जाणारे AI143 चे विमान रद्द करण्यात आले. विमान दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले.
एरंडोल, जळगाव ब्रेक
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी रिंगणगाव येथील ग्रामस्थांनी एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले
मावळ,पुणे
-कुंडमळा दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल
-दुर्घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुंडमळा या ठिकाणी पोचले आहेत
मावळ तालुक्यातील कुंड मळा येथे साकव पुल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता. आता प्रशासनाने नवीन पुलाचा लेआउट आणि मोजणी सुरू केली आहे.
जुन्या कसारा घाटात बर्निंग कारचा थरार घडला असून सुदैवाने यात चालकाला काही इजा झालेली नाही. मात्र आगीत गाडीचे नुकसान झाले आहे.
सुधाकर बडगुजर मुंबईतील भाजपा कार्यालयात वाजतगाजत दाखल झाले आहेत. भाजपात आज प्रवेश करणार, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु
“प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती, ज्यांना जायचं होतं ते गेले. बडगुजर फॅमिली आणि इतर 2012 चे नगरसेवक गेले. सामान्य कार्यकर्ता म्हणून बबन घोलप यांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी इतकं मोठं केलं. बबन नानांनी जायला पाहिजे नव्हतं, त्यांचं आता सध्या उतार वय आहे. उद्धव ठाकरे हे फोन उचलत नाही हे कधी शक्य नाही, ते खोटे बोलत आहेत. आमच्यातील काही गेले ते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत” असं उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी म्हणाले.
“राज साहेब त्यांचा निर्णय घेतील आणि उद्धवसाहेब त्यांचा निर्णय घेतील. दोघेही किती वर्षापासून राजकीय नेते आहेत, ते त्यांचं ठरवतील. कारण राज साहेबांचे शिंदे साहेब आणि देवेंद्रजी सोबत खूप चांगले संबंध आहेत” असं कॅप्टन अभिजीत अडसूळ ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर म्हणाले.
अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर–खर्चाण शिवारात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.
शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात मोठी प्रमाणावर पाणी शिरल्याने भाजीपाला वाहून गेला असून इतर पिकांचे नुकसान झाले आहे
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानात बॉम्बसदृश वस्तू असल्याचा संशय आल्याने इंडिगोच्या विमानासाठी हा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस महाराष्ट्रात नात्यागोत्याचा पक्ष राहिला आहे, टीका करून पक्ष चालत नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याने सांगलीत घडामोडी घडत आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर केली आहे.
कुंडमळा इथे घडलेली पूल कोसळल्याची घटना दुदैवी आहे. मी पुलाच्या दुरुस्तीसाठी मी विभागाला सूचना दिल्या होत्या. मला कळताच मी तातडीने दुरुस्तीच्या सुचना दिल्या होत्या. दिरंगाई केलेल्या दोषींवर कारवाई करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही चव्हाण यांनी काय म्हणलं जाणून घेऊयात.
प्रश्नांना उत्तरं मिळावीत म्हणून राऊत रोज काहीतरी बोलतात. राऊतांवर बोललो तर ते रोज माझ्यावरच बोलत राहतील, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी राऊतांबद्दल दिली.
सुधाकर बडगुजर आमच्या पक्षात नाहीत. त्याबाबत मला काही माहिती नाही. कोण जातंय कोण नाही याबाबत पतंगबाजी सुरु आहे”, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच नाशिकमधील ठाकरेंची शिवसेना मजबूत आहे. सर्व कार्यकर्ते जागेवर आहेत, असंही राऊत म्हणाले.
अमरावतीत जलजीवन मिशन योजनेला केंद्राकडून ठेंगा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात वर्षभरापासून 12 कोटीची देयके थकली आहेत. केंद्राने 2018 साली जलजीवन मिशन उपक्रम घेतला होता. मात्र या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी 2019 साल उजाडलं होतं. जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन साठी जिल्ह्यात 262 कोटीचा आराखडा ठरवण्यात आला. या कामामध्ये 50 टक्के केंद्र आणि 50 टक्के राज्याचा वाटा आहे. राज्याचा निधी नियमित मात्र केंद्राचा निधी अडकला आहे.
येवला-नांदगाव राज्य मार्गावर शेतकऱ्यांकडून रस्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येवला तालुक्यातील राजापूर येथे हे रस्ता रोको आंदोलन केलं जात आहे. या आंदोलन 1 तास चाललं. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. परिणामी वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
नाशिकनंतर पुणे, रायगड आणि विदर्भातील माजी नगरसेवक सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे.
चर्चगेट विरार एसी लोकला गळती होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमवारी दिवसभर मुंबई, वसई विरार सह पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने एसी लोकल ही गळायला लागल्या असल्याचे चित्र समोर आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. 24 तासांत सरासरी 68.68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळपासून उघडीप घेतली आहे.
पुणे शहरात संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे आगमन होणार आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा येण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला.
अमरावतीमध्ये खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यावर्षी बियाणे आणि खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे. जिल्ह्यात यंदा जवळपास सात लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. सर्वाधिक सोयाबीन पाठोपाठ कपाशीची लागवड होणार आहे.
धुळे- 8 जूनला मृग नक्षत्र सुरू झालं, मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस नसल्याने 15 मे नंतर लावलेल्या कपाशी पिकांवर संकट निर्माण झालं आहे. वेळेवर मृग नक्षत्राचा पाऊस येत असतो, मात्र आठ दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पीक धोक्यात आहे. मे महिन्याच्या अखेर पडलेल्या पावसानंतर काही भागात पाऊस नाही.
नाशिक – सुधाकर बडगुजर यांच्यासोबत आज 15 ते 20 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. टीव्ही 9 मराठीच्या हाती नाशिकमधील भाजप प्रवेशाची यादी आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक दिलीप दातीर, अशोक सातभाई हेसुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
टीव्ही 9 मराठीवर बातमी प्रसारित होताच कल्याण तहसीलदारांनी रेती माफियावर धडक कारवाई केली. कल्याणच्या रेतीबंदरवर परिसरात छापा मारत रेती माफियांचे दोन बार्ज जाळून नष्ट केले. कल्याण पश्चिम दुर्गाडी किल्ला आणि रेतीबंदर परिसरात रेती माफियाकडून बेकायदेशीर रेतीचे उत्खनन सुरू होते.
अंधेरी पश्चिम आणि वेसावे येथील जलवाहिनीवरील झडप (Valve) बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून गुरुवार, दिनांक १९ जून २०२५ दुपारी २ वाजेपासून शुक्रवार, दिनांक २० जून मध्यरात्री १ वाजेपर्यंत एकूण ११ तास के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी 7 च्या परिषदेत बोलणार आहेत. 14 देशांचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कॅनडामध्ये आज जी 7 परिषद पार पडणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह कॅनडा, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली हे देशसुद्धा सहभागी होणार आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सकी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतही पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संवाद साधण्याची शक्यता आहे.