
गेल्या तीन महिन्यांपासून दादर ते बोरिवली तसंच अन्य भागातील फेरावाल्यांना बसण्यास मनाई केली जात आहे. तर बसलेल्यांना उठवलं जात आहे. याविरोधात आता फेरीवाले आज (15 जुलै) मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. तर 12 जुलैपासून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत व्यवसाय बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनने दिला आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमधील रहिवाशांचं आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन आहे. घरांच्या संरक्षणासाठी त्यांनी सरकारकडे धाव घेतली आहे. दरम्यान पुण्याील वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात दोषारोपपत्र सादर झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 1676 पानांचा दोषारोपपत्र तयार केला आहे. आत्महत्येच्या 59 दिवसांनी हे दोषारोपपत्र बावधन पोलिसांकडून पुणे सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. वैष्णवीने 16 मे 2025 रोजी आत्महत्या केली होती. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. पाऊस थांबल्यानंतर अचानक तापमानात वाढ झाल्याने मृग बहारातील संत्रा गळून पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी,अचलपूर, चांदुर बाजार तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वेगरे गावातील निरगुडे वस्तीला मुठा नदीवर पूल नसल्यानं नदी धोकादायक पद्धतीने पार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या वस्तीवरील एका मृत व्यक्तीच्या 13 वा विधीसाठी ग्रामस्थांनी धोकादायक पद्धतीने नदी पार केली. नागरिक अनेक दिवसांपासून पुलाची मागणी, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
नाशिकच्या वडाळारोडवर भीषण अपघात झाला आहे. एका आयशर ट्रकने विद्यार्थ्यांनीला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ट्रक चालकाने मद्यपान केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी म्हटलं आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.
नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षण विभागाच्या विरोधात दोन आंदोलने सुरू आहेत. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील शिक्षण संस्थेत सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती न केल्याने शिक्षक दत्ता तावडे सहकुटुंब उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील सुरेगाव येथील चक्रधर कळले यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर स्वतःचे सरण रचून आंदोलन सुरू केल आहे.
पर्यावरण संसदीय समितीच्या दिल्लीतील बैठकीच्या प्रेझेन्टशनमध्ये राजमुद्रेला मास्क घातल्याचे उघड झाले आहे. आज संसदेच्या सायन्स ॲड टेक्नॉलजी इन्वायरमेन्ट फॉरेस्ट अंड क्लायमेट चेंजच्या स्टॅडींग समितीच्या केंद्रीय बैठक पार पडली आहे.
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे.
अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांचे तीन सहकारी पृथ्वीवर यशस्वीपणे दाखल झाले आहेत. मिशन Axiom 4 ही मिशन यशस्वीपणे पार पाडली आहे
क्रिकेटपटू यश दयालला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने यश दयालच्या अटकेवर बंदी घातली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. लखनौ येथील खासदार-आमदार न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 20000रुपयांचे दोन जामीनदार जमा करण्याचे आदेश देऊन जामीन मंजूर केला.
चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी बैठक घेतली.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वीवर आगमनाने संपूर्ण देश आनंदात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभांशू शुक्ला यांच्यासाठी एक पोस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, मी संपूर्ण देशासह ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून, त्यांनी त्यांच्या समर्पण, धैर्य आणि अग्रगण्य भावनेने लाखो स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. आपल्या गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे .
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, रायगड मुसळधार पाऊस सुरु असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. अंधेरी सबवेदेखील पाण्याखाली गेला आहे. घाटकोपरमध्ये पावसाचा जोर कायम असून पंतनगरमध्ये पाणी साचलं आहे. नवीमुंबईतही पावसाचा जोर वाढला असून APMC मार्केट परिसर जलमय झाला आहे.
आंबील ओढा सीमा भिंतीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळाली. 2019 मधे आंबील ओढ्याला सीमाभिंत नसल्याने मोठ्या प्रमाणात पुराने पुणेकरांचे नुकसान केले होते, त्यानंतर सीमाभिंतीसाठी 200 कोटी आणले म्हणून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी बॅनर लावून लोकसभा निवडणुकीत पुणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
मॅनहोलचं झाकण बॅटरीला लागल्याने बसला आग लागल्याची घटना मुंबईतील बिकेसी येथे घडली आहे. अचानक बसला आग लागल्याने प्रवाशांची एकच पळापळ झाली. सिद्धार्थ कॉलेजजवळ डबल डेकर बसचा हा अपघात झाला.
पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! अनेक वर्षांची खंडपीठाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण होणार आहे. कोल्हापूरमध्ये होणार मुंबई हायकोर्टाच खंडपीठ. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळातच हे खंडपीठ होणार आहे. गवई हे येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका मुंबई–गोवा महामार्गालाही बसला आहे. खांब नजीकच्या परिसरात पाणी साचल्यामुळे महामार्गावर अक्षरशः तलावसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून, काही ठिकाणी ती अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.
पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. पैलवानांकडून मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी सहकार नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले आहेत. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन समोरून जाण्याचा आवाहन केले आहे.
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपी दिपक काटे याला कोर्टात हजर केले. थोड्याच वेळात कोर्टात सुनावणीला होणार सुरुवात. अक्कलकोट तालुका प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम एम कल्याणकर यांच्या कोर्टात हजर केले जाणार.
धुळ्यात शहरातील पारो रोडवर पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येबाबत आंदोलन. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवावेत यासाठी आंदोलन सुरु आहे. टाळ वाजवत आणि गांधी टोपी घालत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केलं आंदोलन. येणाऱ्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास शिवसेना स्टाईल करणारा आंदोलन.
सांगलीच्या चांदोली धरण परिसरात उसंत घेतलेल्या पावसाची पुन्हा संततधार सुरू. आज चांदोली धरणातून 8530 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार. नदीकडच्या गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा.
गेले दोन दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. या पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातल्या कशेडी घाटाला बसतोय. कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पडलेली दरड हटवण्याचे काम स्थानिक प्रशासनातून कडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
परभणी शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस माजवला आहे. शहरातील सुभाष रोड आणि रोशन खान मोहल्ला या ठिकाणी मोकाट कुत्र्याने एका वृद्ध महिला आणि मुलाला चावा घेतल्याने दोघेही जखमी झाले आहे. त्यामुळे परभणीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
यंदा कपाशीला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांनी सर्वाधिक पेरणी ही मक्याची केली आहे. कपाशीपेक्षा जास्त पेरणी मक्याची केली असताना आता मात्र धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस नसल्याने मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. लष्करी अळी मक्याची पाने खाऊ लागले आहेत. त्यामुळे उत्पन्न घटनेची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला
महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ही सर्वात आनंदाची बाब आहे. जगातील सर्वात स्मार्ट कार ती मुंबईपासून आता भारतात लाँच होत आहे. महाराष्ट्र सरकारने EV गाड्यांसाठी अनेक सुविधा लागू केल्या आहेत. चार्जिंग स्टेशन, गाडीवरचे टॅक्सेस आणि विविध इन्सेन्टीव्ह त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील EV करिता सर्वात आवडते ठिकाण झाले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत टेस्लाच्या शोरुमचा उद्घाटन सोहळा आज मुंबईत पार पडला. मुंबईतील बीकेसी परिसरात देशातील पहिल्या शोरुमचे उद्घाटन करण्यात आले. आजपासून मुंबईत टेस्लाच्या वाहनांची विक्री सुरु केली जाणार आहे.
नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्कल आणि गणांची नवीन प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेचे 57 गट आणि पंचायत समितीचे 114 गण जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेतील अनेक मोठ्या नेत्यांच्या सर्कल रचनेत फेरबदल झाले आहे.
बुलढाणा तालुक्यातील धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या मिलन सायकल आणि टायर दुकानाला रात्री अचानक आग लागली. या घटनेत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
जालना जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आता अंतर मशागतीच्या कामात व्यस्त आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई आणि आसपासच्या परिसरात खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशी आणि इतर पिकांच्या अंतर मशागतीला वेग आला.
जळगावातील दत्तनगर आणि सुनंदिनी पार्क भागात गेल्या २५ ते ३० वर्षापासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांनी महानगरपालिवर मोर्चा काढत प्रचंड संताप व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यात 40 लाख वृक्ष लागवड होणार आहे. त्यामध्ये 19 जुलै रोजी 24 तासात 15 लाखाहून जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. केंद्र सरकारची एक पेड मा के नाम, तसेच राज्य सरकारच माझी वसुंधरा अभियान आणि हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून ही रेकॉर्डब्रेक वृक्ष लागवड केली जाणार आहे.
जळगावात शेतकऱ्याची परवानगी न घेता त्याच्या मालकीच्या 2 एकर जमिनीवरून हजारो ब्रास गौणखनिजाची उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून चोरून नेलेल्या हजारो ब्रास गौणखनिजाचा पाळधी – तरसोद बायपास महामार्गाच्या कामासाठी वापर झाल्याचे सुद्धा शेतमालकाने म्हटलं आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील फुलपाट गावाजवळील टहाकळी शिवारात ही घटना घडली असून शेतकरी कैलास भोळे यांनी याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रार केली आहे
दादर कबुतरखान्यात नियमांचं उल्लंघन सुरूच आहे. बीएमसीकडून कारवाई करत 107 जणांवर 55,700 रुपयांची दंड वसुली झाली. दादरमध्ये सर्वाधिक कारवाई झाली. 50 किलो धान्य जप्त करत धान्य पुरवठादारांना नोटीस बजावण्यात आली. नियम मोडल्यास पोलिसांकडून कठोर कारवाईचा पालिकेकडून इशारा देण्यात आला.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणात केवळ 48 टक्के जलसाठा आहे. पश्चिम विदर्भात 9 मोठे, मध्यम 27 आणि लघु 253 प्रकल्प आहेत. सर्वात कमी जलसाठा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात 9 टक्के जलसाठा आहे. जुलैचा अर्धा महिना लोटला तरी प्रकल्पात जलसाठा निम्म्यावर आहे.
आयकर विभागाकडून देशभरातील सुमारे २०० ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी सुरू होती. चार्टर्ड अकाऊंटंट आणि टॅक्स प्रॅक्टिसनर्स यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. राजकीय पक्षांच्या नावाने देणग्या स्वीकारून करचोरीच्या संशयावरून छापे मारण्यात आले.
बीएमसी निवडणुकीपूर्वी चारकोपमध्ये एसी बस सेवा सुरू करण्यावरून भाजप आणि ठाकरे शिवसेनेत श्रेयवाद सुरू आहे. चारकोप विधानसभामध्ये बस क्रमांक 278 एसी बस सेवा सुरू करण्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू आहे. दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या वेळी एकाच बसचं उद्घाटन केलं आहे.
डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमधील रहिवाशी आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. घरांच्या संरक्षणासाठी त्यांनी सरकारकडे धाव घेतली आहे.
कसारा रेल्वे स्थानकावर टीसीकडून सात वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग करण्यात आला. तिकीट तपासणीच्या बहाण्याने टीसी रमेशकुमार शर्माने गैरवर्तन केलं. पीडितेच्या आईने उपमुख्यमंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी टीसीचा शोध सुरू आहे.
फेरीवाले आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून दादर ते बोरिवली तसंच अन्य भागातील फेरीवाल्यांना उठवण्यात येत आहे. याविरोधात ते मोर्चा काढणार आहेत.
वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात दोषारोपपत्र सादर झाला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 1676 पानांचा दोषारोपपत्र तयार केलाय. आत्महत्येच्या 59 दिवसांनी हे दोषारोपपत्र बावधन पोलिसांकडून पुणे सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. वैष्णवीने 16 मे 2025 रोजी आत्महत्या केली होती.