
Election Commission Press Conference on Maharashtra Election: आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची सर्वांनाच उत्सुकता असून आज या निवडणुकांची तारीख घोषित होऊ शकते. आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत, या सर्व निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील एकूण २९ महापालिका आणि अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, अशा अनेक प्रमुख शहरांमधील महापालिकांचा समावेश आहे, त्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होऊ शकते. त्यामुळे निवडणूक आजच्या पत्रकार परिषदेकडेसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
निवडणूक जाहीर होताच तयारीला सुरुवात
केमिस्ट भवन येथे मुलाखती देण्यासाठी इच्छूक उमेदवारांची गर्दी
मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना
मनोज जरांगे विमानाने दिल्लीला जाणार
सूर्य पाटील यांच्या कुटुंबाची उद्या घेणार सांत्वनपर भेट
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ
सोन्याच्या दरात 1 हजार 300 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांनी वाढ
सोन्याचे दर 1 लाख 36 हजार 784 रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 96 हजार 730 रुपयांवर
सोन्या चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ
दादरमध्ये मच्छी मार्केटविरोधात संताप
सेनापती बापट मार्गावर रास्ता रोकोनंतर आता स्थानिक रहिवाशांचं जी उत्तर विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन
आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांसह महिलांचा सहभाग
स्व. मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील मच्छी मार्केटला रहिवाशांचा तीव्र विरोध
दुर्गंधी, घाण पाणी व वाढत्या गर्दीमुळे परिसरातील नागरिक हैराण
पुण्यात कोयता गँग दिसता कामा नये, असं अजित पवार यांनी सांगितलं. कोणीही त्यात राजकीय हस्तक्षेप करणार नाही असं अजित पवार यांनी आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगितलं.
राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसशिवाय युती होण्याची शक्यता आहे.
निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. बिल्डर जनता पार्टी असा उल्लेख करत डिवचलं आहे. तसेच शिंदेंचा उल्लेख फेकनाथ मिंधे असा केला आहे. भाजपात्या फसव्या घोषणांना भुलू नका, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आले तरी आणि नाही तरी लोकं महायुतीला निवडून देतील. इतकंच काय तर त्यांच्यासोबत काँग्रेस जरी आली तर महायुतीच जिंकेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आम्ही केलेला विकास आणि मराठी माणसाचं जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलं असल्याने मुंबईकर आमच्यासोबत राहतील.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होईल का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस याना विचारला गेला. यावर फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि भजापाचा युती होईल.
आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत.जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा शिवसेना राष्ट्रवादीची युती होईल. एक दोन ठिकाणी तुम्हाला भाजपा राष्ट्रवादीची युती पाहायला मिळेल. पुण्यात अजित दादा आणि आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षात पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे पुण्यात कदाचित भाजपा आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसतील. असं असलं तरी मैत्रिपूर्ण लढत असेल. या कुठेही कटुता नसेल., असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
15 जानेवारीला राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी होईल. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. कारण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या भरवशावर चालवणं हे काय लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. दीर्घ काळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा निवडणुका होत आहेत. आम्ही केलेलं काम पाहता कौल आमच्या बाजूने येईल. जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल. हा मला विश्वास आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
15 जानेवारी रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मिरा भाईँदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर येथे पालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे. तसेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून आलेली आहे. त्यातील एकही नाव डिलीट करण्याचे अधिकारी राज्य आयोगाला नाही, फक्त नाव दुसऱ्या प्रभागात गेल असेल तर दुसरुस्ती करता येईल. दुबार मतदान संदर्भात जी प्रक्रिया आहे, घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे. त्यांना विचारलं आहे की तुम्ही कुठे मतदान करणार, त्याव्यतिरिक्त त्याला दुसरीकडे मतदान करता येणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून २९० निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर ८७० सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. ४८ तास आधी प्रचारावर निर्बंध असणार आहे. आजपासून सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता सुरू करण्यात आली आहे.
पालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज करण्याची तारखी 23 डिसेंबर आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार. 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार. सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचं हमी पत्र द्यावी लागेल. नाही दिलं तर निवड रद्द होईल.
राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्याबाबत कार्यवाही केली आहे असेही सांगण्यात आले आहे. राज्यातील २९ महापालिकेबाबतची पत्रकार परिषद आहे. २७ची मुदत संपली आहे. जालना आणि इचलकरंजी या नवीन महापालिका आहेत, त्यांचीही निवडणूक होणार आहे.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु आहे. त्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहिर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बुलढाणा : जिवंतपणीच आईचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जामोद नगर परिषदने हे प्रमाणपत्र दिले होते. मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांच्या तक्रारीवरून कौशल्याबाई राजपूत यांचे पुत्र प्रेम सिंह राजपूत याच्यावर विविध कलमान्वये जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या तपोवननंतर आता ठाण्यात देखील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे 3300 बेडचे बंगळूरच्या धर्तीवर नवीन बांधकाम सुरू होणार आहे. या बांधकामामुळे परिसरातील झाडे बाधित होणार आहेत. मनोरुग्णालयाच्या आवारात एकूण 16 हजार 14 झाडे असून, त्यापैकी 700 हून अधिक झाडांची वृक्षतोड केली जाणार आहे. या प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि मनसे पर्यावरण महाराष्ट्र अध्यक्ष जय शिंगणापूरे यांनी आज झाडांना पक्षाचे मफलर बांधून प्रत्येक झाडाची नोंद केली. ही झाडे न तोडण्याचे आवाहन केले आहे. मनसेच्या वतीने या जागेची पाहणी यापूर्वी देखील करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरात एका खासगी डॉक्टरच्या कथित हलगर्जीपणामुळे 13 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शिरूर कासार शहरातील मुख्य चौकात ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. तसेच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. डॉक्टरच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारामुळेच मुलीचा जीव गेला, असा आरोप मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी केला आहे. संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ज्या गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत ढाकणे यांच्यावर हे आरोप आहेत. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मला यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे सांगून बोलणे थांबवले.
मुंबईतील दादर परिसरात स्व. मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील मच्छी मार्केटला स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध होत असून, संतप्त नागरिकांनी थेट मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त जी उत्तर विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. दुर्गंधी, घाण पाणी आणि मच्छी मार्केटमुळे वाढलेल्या गर्दीमुळे परिसरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. शाळकरी मुले, कामावर जाणाऱ्या महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक रहिवासी आक्रमक झाले आहेत. सेनापती बापट मार्गावर रास्ता रोको केल्यानंतर आता हे आंदोलन जी उत्तर विभाग कार्यालयाबाहेर सुरू झाले आहे, ज्यात मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला सहभागी झाल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात जिवंत असलेल्या वृद्ध महिलेला मृत्यू प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मोठा अपडेट समोर आला आहे. जळगाव जामोद नगर परिषदेने ‘त्या’ जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत या वृद्ध महिलेचे दिलेले मृत्यू प्रमाणपत्र अखेर रद्द केले आहे. कौशल्याबाई राजपूत यांचा मुलगा प्रेम सिंह राजपूत याने नगर परिषदेची दिशाभूल करून हे प्रमाणपत्र मिळवले होते. या गंभीर प्रकारामुळे, नगरपरिषद प्रशासन आता प्रेम सिंह राजपूत याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे. तशी रीतसर तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. याबाबतची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी दिली आहे.
गिरीश महाजन यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विरोधकांवर टीका केली आहे. “नाशिकमध्ये 100 चा आकडा पार करणे आम्हाला कठीण नाही.
हरण्याआधीच विरोधकांनी कारणं देणं सुरु केलं आहे.” असं महाजनांनी म्हटलं आहे.
बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी जनआक्रोश आंदोलन केलं आहे. बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत.
शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “आगामी काळात भाजपात अजून पक्षप्रवेश होणार आहेत. आगे आगे देखो होता है क्या” असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे.त्यामुळे आता उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
भाजप ही बिल्डर जनता पार्टी झाली आहे. पागडीमुक्त मुंबई ही घोषणा केवळ फसवी आहे. लाडक्या बहिणींना अद्याप 2100 रुपये दिले नाहीत. आमच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री हास्यास्पद उत्तरं देतात, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
भाजपकडून फसव्या घोषणा दिल्या जात आहेत, त्यांना बळी पडू नका. मतदार यादीतील घोळ कोण सोडवणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला.
मुघलांनी आपल्या देवी-देवतांची मंदिरं पाडली. पुण्यस्थळं पाडण्याचं काम मुघलांनी केलं. अहिल्यादेवींनी देशातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवींनी 28 वर्षे राज्यकारभार चालवला, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सांगलीत अहिल्यादेवींच्या अश्वारुढ पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालं. शहरातल्या शिंदे मळा येथील लव्हली सर्कल या ठिकाणी भव्य असा अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. यावेळी भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते.
कल्याणमधील महेश गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठा अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून आणखी दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भाजप माजी आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे.
कुणाल पाटील आणि नागेश भालेराव या दोन आरोपींना आज जामीन मंजूर झाला आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्यापूर्वी विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा धडाका. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन. नाशिकच्या कालिदास कला मंदिर नाट्यगृहात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शहरातील आमदार , साधु- महंत , महानगरपालिका कुंभमेळा प्रधिकरणाचे अध्यक्ष , कुंभमेळा आयुक्त जिल्हाधिकारी , मनपा आयुक्त उपस्थित. अमृत योजनेअंतर्गत मल नि: सारण व्यवस्था, वाहनतळ ,रस्ते विकसित करणे वाहन तळ यासारख्या विविध विकासकामांचे भूमिपूजन.
पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या शितल तेजवानीला आज न्यायालयीन कोठडी होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये मुद्रांक शुल्क चुकवल्या प्रकरणी शितल तेजवानीवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शितल तेजवानीचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अर्ज केला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस शितल तेजवानीला आज न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेण्याची शक्यता.
राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आज जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पत्रकारपरिषद.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागाला जोडण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन रस्ता बांधण्यात आला. पण हा रस्ता सहा महिन्यातच पूर्ण उखडला व निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्ड्यांमधून दुर्गम भागातील आदिवासींना प्रवास करावा लागत आहे.
मोहाडी परिसरातील वाल्मीक वसाहतीत राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. घरातून दोन सिलेंडर सह वृद्धेच्या अंगावरील सोन लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेसह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात नागरीक आक्रमक झाले आहेत. बिबटेमुक्त तालूका करा अशी मागणी करण्यात आली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांना जिव गमवावा लागला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरीकांचे कठीण जगणे झाले आहे. शाळकरी मुलं, शेतकरी यांच्यावर बिबट्यांचे हल्ले वाढतआहेत. संगमनेर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं.
मनमाड इंदोर रेल्वे मार्गांच्या अधिग्रहित केली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मनमाड – इंदोर रेल्वे मार्गांच्या अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शासनाकडून मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय… रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या अधिग्रहण दर कमी लावण्यात आला असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना विचारात घेण्याची शेतकऱ्यांची मागणी केली आहे.
साधू ग्राम हजारो वर्षांपासू जिथे होतात तिथेच राहणार…. साधू ग्राम तिथेच होता आहे आणि राहणार… असं वक्तव्य अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी केलं आहे. आवश्यकता असेल तरच झाड इतरत्र हलवले जाणार… काही वामपंथी लोक म्हणतात की साधू ग्राम दुसरीकडे हलवावे पण ही हजारो वर्षांची परंपरा आहे… असं देखील हरिगिरी महाराज म्हणाले.
दादरच्या सेनापती बापट मार्गावर भाजप पदाधिकारी आणि संतप्त स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावरील मासे विक्रेत्यांना विरोध करत रास्ता रोको आंदोलन केले. वाहतूक कोंडी, घाण आणि आरोग्याच्या समस्यांना कंटाळलेल्या नागरिकांनी अनेक तक्रारींना महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मागण्या पूर्ण न झाल्यास दररोज आंदोलन करण्याची धमकी देत मच्छी मार्केट हटवण्याची संतप्त मागणी आंदोलकांनी केली.
नाशिकमध्ये १५,००० झाडे लावण्याच्या महा-वृक्षारोपण अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे. या कार्यक्रमात गिरीश महाजन, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख साधू-महंत तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील १३ आखाड्यांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४ वेगवेगळ्या ठिकाणी १,००० झाडांचे रोपण होणार आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील महामंडलेश्वर देखील उपस्थित राहतील.
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. विकासाची काम करण्यासाठी भाजपात प्रवेश केला, अशी पहिली प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांनी दिली आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याबद्दल भाष्य केले. कोणी कोणाबरोबर जावं हा त्यांचा प्रश्न आहे. कोणी कोणाच्या दारात गेलेले नाही. ज्या त्या पक्षाच्या प्रमुखाला योग्य वाटेल, त्याप्रमाणे तो योग्य वेळेला निर्णय घेईल. अशाच प्रकारची भूमिका ज्या त्या पक्ष घेत असेल तर आम्ही त्यांचा अभिनंदन करतो, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.
मराठी माणूस पुढे येऊन असे पोस्टर लावत असेल तर त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो. राज ठाकरे यांची भाषण मराठी माणसांना उद्देशून असतात. मराठी माणूस एकत्र आले पाहिजे, या दृष्टीने अनेक भाषण राज ठाकरे यांनी केलेली आहे. राज ठाकरे यांचे मत त्यांना आवडलं असेल आणि ते उचलून त्यांनी अशाप्रकारचा उपक्रम हाती घेतला असेल ते स्वागतार्य आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली.
बीडच्या मांजरसुंबा घाटात धुळे-सोलापूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मोठा स्फोट झाला होता. या प्रकरणी टँकर चालक नशीर सय्यद यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिसात कंटेनर चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याने आणि अपघाताची माहिती न देता निघून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. तर दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणातील जामीनवर सुटलेल्या विनोद गंगणे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे. विनोद गंगणे हे तुळजापूर मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. बदनामी केल्याप्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकरांवर गंगणे यांचा अब्रू नुकसानीचा दहा कोटी रुपयांचा दावा ठोकण्यात आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्यात येणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार 16 डिसेंबर पासून इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारणार.राष्ट्रवादी अजित पवार गटाने सोलापूर महानगरपालिकेसाठी ‘अब की बार 75 पार’ चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी चाचपणी सुरु आहे
वृक्षारोपण कार्यक्रमासह विविध विकास कामांचे भूमिपूजन. अमृत योजनेअंतर्गत मल नि: सारण व्यवस्था विकसित करणे , कुंभमेळ्यासाठी शहरातील सात रस्ते विकसित करणे अशा विविध कामांचे भूमिपूजन तर रामकालपथ निर्मितीसाठी 63 विस्थापित झालेल्या रहिवाशांना सदनिका वाटप करणे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांच्या भूमिपूजन व इतर कार्यक्रमांना लावणार हजेरी
जळगावातील निमखेडी गावात तरुणाचा धारधार शस्त्राने डोक्यात वार करून खून झाल्याची घटना घडली आहे. सागर साहेबराव सोनवणे असे खून झालेल्या मयत तरुणाचे नाव आहे. खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. रविवारी रात्री मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्याने उमरग्यात वातावरण तापले. सर्वसामान्य घरातील महिला उमेदवाराला बदनाम करू नका परिणाम भोगावे लागतील, भाजपने पत्रकार परिषद घेत खासदारांना दिला इशारा. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा मध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपचा पंतप्रधान बदलणार हे तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सांगणार का ?.. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधारासह सांगावे… कपिल पाटील यांचे पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हानय नागपूर बैठकीनंतर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये युती झाली आहे; कार्यकर्त्यांच्या भावना काहीही असल्या तरी वाद-विवादाचा प्रश्न नाही.
शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या आदेशावरून संतोष ढवळे, विधानसभा प्रमुख, यांनी यवतमाळ नगर परिषदेमध्ये पक्षाच्या विरोधात जाऊन, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष व इतर शिवसेना नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात, काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्यामुळे त्यांच्यावर पक्ष विरोधी कार्य केल्यामुळे, त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
महापालिका निवडणुकीपूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसू शकतो. घोसाळकर कुटुंबातील सून आणि वार्ड क्र.१ च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आज शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांची सून आणि दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. त्या मुंबई बँकेच्या संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि दोघांमध्ये चर्चा झाली होती. आज त्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.
सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला आहे. – लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून चालू कारखान्याचे गाळप बंद पाडले. जोपर्यंत साखर कारखाना उसाला दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखाना सुरु करू देणार नसल्याची स्वाभिमानीची भूमिका आहे.
दादर शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणात निनावी पोस्टर्स पाहायला मिळत असून सर्वांचे त्याकडे लक्ष वेधलं गेलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक ही कधीही जाहीर होऊ शकते. त्याच अनुषंगाने मराठी माणूस जागा हो आणि रात्र वैऱ्याची आहे आणि मराठी माणसा मुंबई वाचव , तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे , यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावे लागेल असे उल्लेख केलेले काही पोस्टर्स दादर परिसरात लावण्यात आले आहेत.
– आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेच्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात 1 हजार नवीन झाडांची लागवड होणार आहे. मंत्री गिरीश महाजन साधू,महंत आणि काही आखाड्यांचे प्रमुखांच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपण सोहळा होणार असून त्यासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथून खास देशी प्रजातीची झाडं मागवण्यात आली आहेत.
-टप्प्याटप्प्याने शहरात तब्बल 15 हजार झाडांची लागवड होणार आहे. आज या मोहिमेअंतर्गत मखमालाबादसह इतर 4 ठिकाणी पहिल्या टप्प्यात 1 हजार झाडं लावण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकसमिती घोषित करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निवडणूक समितीची घोषणा झाली असून या समितीमध्ये समिती मध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उप नेते सुभाष पाटील हे मुख्य मार्गदर्शक आहेत. तसचे या समितीमध्ये शहरातील पदाधिकारी यांच्यासह 11 जणांचा समावेश आहे. समिती घोषित झाल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून इच्छुकांना 17 डिसेंबर ला अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.