
Solapur Municipal Corporation Election : सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी निकाल होईल. 30 डिसेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले उमदेवारी अर्ज दाखल करता येतील. हीच बाब लक्षात घेता स्थानिक पदाधिकारी, नेते राजीनामे देताना दिसत आहेत. सोलापुरात तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. येथे सोलापुरातील बडे नेता तथा जिल्हाप्रमुखाने आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला आता मोठा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते नाराज होते. पक्षातील अंतर्गत वादामुळे आपण हा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.एकीकडे दुपारीच 100 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले असताना आता थेट जिल्हाप्रमुखांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वावर सर्वांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पक्षातील बंडाळाची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोलापुरात जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्याविरोधात ठाकरे गटात मोठी खदखद पाहायला मिळत आहे. पालिका निवडणुकीची जबाबदारी ठाकरे यांनी दासरी यांच्यावरच सोपवलेली आहे. परंतु त्यांच्या कारभारावर इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज आहे. याच कारणामुळे सोलापुरातील 100 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 100 पेक्षा अधिक पदाधिकारी तसेच जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गट हा फटका कसा भरुन काढणार तसेच सोलापुरात निवडणूक जिंकण्यासाठी नेमकं काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.