Dasara Melawa: तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग… उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले
उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपकडून अनेकदा ठाकरे गटाने हिंदूत्व सोडलं असा आरोप केला जातो. याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपकडून अनेकदा ठाकरे गटाने हिंदूत्व सोडलं असा आरोप केला जातो. याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला की, ‘तुमच्या फडक्यावरचा (झेंड्यावरचा) हिरवा रंग काढा आणि मग आमच्याशी हिंदूत्वाबद्दल बोला.’ उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
भाजपवर सडकून टीका
आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं की, लढेल तो तुरुंगात जाईल अशी सरकारची वृ्त्ती आहे. कमळाबाईने चिखल करुन ठेवला आहे. 3 वर्षे झालं मणिपूर जळत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता तिकडे गेले आहेत. तिथल्या महिलांची धिंड निघत आहे. तरीही मोदी गेले नाहीत. आता ते गेले त्यावेळी वाटलं की ते पीडितांना भेटतील. मात्र त्यांना मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातील पाणी नाही दिसलं. भाजप म्हणजे आता अमिबा झाला आहे, पाहिजे त्यासोबत युती करतात आणी हातपाय पसरत आहे. इंडिया टुडेने सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असा सर्वे केला. आमची सत्ता असताना मुख्यमंत्री पहिल्या पाचात होता. मात्र आताचे मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत.
शिवसेना प्रमुखांनी सांगितले आहे की धर्म कुणाचा कोणताही असू शकतो, मात्र आम्ही हिंदू आहोत, कुणी मुस्लिम आहोत, कोणी ख्रिश्चन आहेत. धर्म कुणाला कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे हिंदुस्थान. धर्म हा घरामध्ये ठेवा, बाहेर पडलं की आमचा देश हा आमचा धर्म ही आमची शिकवण आहे.
आधी फडक्यावरील हिरवा रंग काढा आणि…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जे भाजपवाले आमच्या अंगावर येत आहेत आणि म्हणत आहेत की. यांनी मुंबई जिंकली तर खान महापौर होणार, अरे तुम्ही मुंबई जिंकली तर, त्या अदाणीच्या चरणावर तुम्ही मुंबई समर्पयामी करून टाकाल. जाणवं घालालं, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी असं म्हणाल. तुम्ही व्यापारी म्हणून मुंबईकडे पाहता, आम्ही जीव म्हणून मुंबईकडे पाहतो. आम्हाला जर हिंदूत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. तुमचं ते फडकं आहे तो भगवा असू शकत नाही. कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे. आधी फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावर या.’
