Uddhav Thackrey : देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीत जेवायला बोलवीन, पण… उद्धव ठाकरे यांचं ऐन निवडणुकीत सर्वात मोठं विधान; काय घडतंय महाराष्ट्रात ?
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीत जेवायला बोलावण्याची अट घातली आहे. मातोश्री, शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवल्यास दरवाजे खुले होतील, असे ते म्हणाले. अमित शहांनी मातोश्रीत शब्द मोडून गद्दारी केल्याची आठवण करून देत, खरा मित्र कोण असतो हे त्यांनी अधोरेखित केले. ही केवळ राजकीय लढाई नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राजकारण आणि निवडणूक म्हटलं की आरोप-प्रत्यारोप येतातचंय. महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांच्या मुलाखती, सभा, संवाद यांचे पर्व सुरू आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करतानाही दिसतात. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याही अनेक सभा, मुलाखती सुरू असून काल एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की निवडणुकीनंतर जर मला राज ठाकरेंनी प्यायला बोलावलं तर मी जाईन किंवा ते माझ्या घरी येतील. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017 ला बंद केलं.
टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्याशी संवाद साधत मुलाखत घेतली. फडणवीसांच्याया विधानाबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अगदी थेट उत्तर दिलं. काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
फडणवीसांना जेवायला बोलावेन मी..
असं अजिबात नाही. आम्ही फडणवीस यांना दरवाजे बंद केले नाही. असं कधी नाही झालं. माणुसकी विसरणारा मी माणूस नाही. पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघाला. मातोश्रीवर आरोप करायला निघाला, बदनाम करायला निघाला. ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. दरवाजे उघडतील हे एवढ्यासाठी म्हणतोय त्यांनी बकवास करणं बंद करावं. मातोश्रीला बदनाम करणं बंद करावं. आमची कौटुंबिक बदनामी बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी मी कधी केली नाही. माझ्याकडे माहिती असून केली नाही. आम्ही का त्यांच्याशी शत्रूत्व करतो. मित्रच होतो ना आम्ही. खरा मित्र कोण असतो जो वाईटाला वाईट करतो सांगेल. वाईट करत असताना वाहवा करणारा मित्र नसतो. तो हितशत्रू असतो. हे हिंदुत्व बदनाम करतात, महाराष्ट्र बदनाम करतात, महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करत आहात. मुंबई अदानीला विकू नका. मुंबईची अस्मिता कायम ठेवा. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. जेवायला बोलावेन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मातोश्रीत अमित शाहंनी मला शब्द दिला आणि मोडला..
वैयक्तिक शत्रूत्व कुणाशी का आणि का करू ?. पण ज्यावेळी तुम्ही पराकोटीचे विचित्र वागू लागता त्यावेळी सॉरी बाबा माझं नाही जमत. मी कुणाच्या जीवावर नाही उठलो. तुमचा पक्ष खतम करायला निघालो नाही. जसं तुम्ही वागत आहात. ज्या मातोश्रीत शिवसेना आहे, ती शिवसेना खतम करायला निघाला त्या मातोश्रीच्या दरवाजाची गोष्ट करता. मातोश्रीत अमित शाहांनी मला शब्द दिला आणि मोडला त्या मातोश्रीच्या दरवाजाबाबत बोलत आहात. वरती बसले होते ते. त्यांना सर्व माहीत आहे. तुम्ही मातोश्रीच्या आतच होता. घरात घेऊन दार बंद केलं होतं. आता घराबाहेर जाऊन बंद केलं. शब्द मोडल्यामुळे मी दार बंद केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एक मित्र तर गमावला..
मी मला काही मागितलं नव्हतं. शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं. कारण बाळासाहेबांना मी वचन दिलं होतं. तेच तुम्ही गद्दारी करून घेतलं. मग मिळवलंत काय. एक मित्र तर गमावला. समोर खड्डा आहे सांगणारा मित्र गमावला. आता खड्डयातील रस्त्यावरून जात आहे. मातोश्रीची बदनामी थांबवली पाहिजे. मातोश्रीत आजही लोकांना भेटतो. कुणालाही प्रवेश करायचा असेल तर मातोश्रीत येतात. सेना भवनापेक्षा मातोश्रीत येतात असंही त्यांनी नमूद केलं.
