‘एक लाख रुपये देतो फक्त…’ उद्धव ठाकरेंचं CM फडणवीसांना चॅलेंज; नेमकं काय म्हणाले? वाचा…
Thackeray vs Fadnavis : उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना एक चॅलेंज दिले आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधुंची सभा पार पडली. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी जोरदार भाषण केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना एक चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज नेमकं काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना म्हटले की, ‘या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल. राज मराठी बांधवांनो आणि माता भगिनीनो म्हणाले. उद्धव ठाकरे हे हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणाले. हेच तर आमचं म्हणणं आहे. त्यांनी सुरुवात केली. आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार. फडणवीस म्हणाले की हिंदू महापौर. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे. तपासून पाहा काय तपासायचं तर. डोकं, सर्टिफिकेट वगैरे म्हणतोय मी. राज तू सांगितलं की पोटभरून जेवणं देणार आहे, एवढं पोटभरल्यानंतर पोटतिडकीने सांगितल्यावर पोटाला तिडीक लागून चालणार नाही. डोक्याला तिडीक लागली पाहिजे. ती लागणार नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी नाही. जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार नाही.
लाचार माकडं वाघ बनू शकत नाहीत…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला पहिली सभा आठवते. खाली माँ साहेबांच्या मांडीवर बसून मी सभा ऐकली. प्रबोधनकार होते. बाळासाहेब होते आणि श्रीकांतजी होते. काही कळत नव्हते. आज ते कळतं. तेव्हा खाली बसलो होतो. आज आमच्या खांद्यावर धुरा आली. आज कळलं असेल ठाकरे बंधू एकत्र का आले. जयंतराव भावकी एक झाली. आता गावकीही एक होत आहे. ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का हे विचारत होते. ठाकरेंचं अस्तित्व ठरवणारे जन्माला आले नाही. समोर बसले हे ठाकरेंचं अस्तित्व आहे. ही लाचार माकडं वाघ बनू शकत नाही. आता लक्षात आलं असेल शिवसेना संपवण्या मागचा यांचा डाव काय होता.
उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चॅलेंज
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम रक्तात असावं लागतं. आमच्या डोळ्या देखतच लचके तोडत असतील तर आम्ही बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा हे काय लचके तोडताना पाहणार आहेत. मराठीसाठी एकत्र आलोत. आमच्यात वाद नव्हते. ते वाद आम्ही गाडून टाकले आहेत. मराठी आणि हिंदुंसाठी एक आलो आहोत. महापालिकेची निवडणूक आहे. भाजप काय करतं. पूर्वी विकृत डान्स होता. रोम्बासोम्बा म्हणायचे. लोकांनी विरोध केल्यावर तो बंद झाला.’
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा चॅलेंज देताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंचं एक भाषण विकासाचं भाषण दाखवा मी हजार रुपये देतो म्हणाले. नको चोराचा पैसा नको. फडणवीसांना मी चॅलेंज देतो, मोदींपासूनच तुमचं आणि चुमच्या चेल्या चपाट्यांचं हिंदू मुस्लिम न करता केलेलं एक भाषण दाखवा मी एक लाख रुपये देतो.
