मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असतानाच उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्यावर थेट ईडीची धाड; काय आहे प्रकरण ?
राज्यात निवडणुकांचे वातावरण असतानाच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. 2021 मधील रेती विक्री गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई सुरू असून, अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या तोंडावर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात सगळीकडे 29 महापालिकांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेवर आपलाच महापौर बसवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी उलट्यासुलट्या युत्या, आघाड्याही केल्या आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काही राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. तर काहींनी शाखांना भेटी देण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. एकीकडे ही धामधूम सुरू असतानाच ठाकरे गटाला (Thackeray Faction) मात्र धक्का देणारी एक घटना घडली आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या घर आणि कार्यालयावर ईडीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात ईडीची जोरदार छापेमारी सुरू आहे. सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी सुरू केल्याने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेती विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. राज्यात निवडणुकांचा फड झडत असतानाच ही छापेमारी होत आहे. त्यामुळे छापेमारीच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
10 पथके शहरात…
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने सकाळीच छापा टाकला आहे. नागपूर आणि दिल्लीच्या ईडीच्या 10 पथकांकडून ही छापेमारी करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईडीच्या अधिकाऱ्यांचा ताफा नागपुरात आला. पहाटे 5 वाजल्यापासूनच त्यांनी वेगवेगळ्या भागात छापेमारी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
2021चं प्रकरण…
2021 मधील रेती तस्करी प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. सावनेरमध्ये प्रफुल्ल आणि उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. पाटणसावंगीमध्ये शरद रॅाय, मनोज गायकवाड आणि खापा येथे अमित राय यांच्यावर घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. तर ईडी आता काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ईडीकडून या प्रकरणात मोठी कारवाई झाल्यास ठाकरे गटासाठी तो मोठा धक्का असेल असं मानलं जात आहे.
