महाबळेश्वर पर्यटन भोवलं, वाधवान कुटुंबासह 23 जणांवर गुन्हे, पाचगणीत 14 दिवस क्वारंटाइन

वाधवान कुटुंबाशी निगडीत 23 जणांविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wadhawan Family FIR and Quarantine in Panchgani)

महाबळेश्वर पर्यटन भोवलं, वाधवान कुटुंबासह 23 जणांवर गुन्हे, पाचगणीत 14 दिवस क्वारंटाइन

सातारा : राज्य सरकारचे आदेश धुडकावून सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती कपिल आणि धीरज वाधवान यांच्यासह 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबाशी निगडीत 23 जणांना पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयात 14 दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. ‘कोरोना’ फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन असतानाही या कालावधीत ‘डीएचएफएल’चे संस्थापक असलेल्या वाधवान कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रधान सचिवांनी मदत केल्याने वाद निर्माण झाला होता. (Wadhawan Family FIR and Quarantine in Panchgani)

प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा करुन गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे.

वाधवान कुटुंबाशी निगडीत 23 जणांविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 51/2020 भादंवि कलम 188, 269, 270, 34 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51-ब साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 चे कलम 2 च्या अनुषंगाने स्थापित केलेल्या कोविड-19 उपाययोजना 2020 च्या 11 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयात सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवरुन वाधवान बंधूंना एक पत्र जारी करण्यात आले आहे. वाधवान बंधूंचा ‘माझे कौटुंबिक मित्र’ असा उल्लेख करत अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी विशेष पास जारी केला होता.

या सर्वांना कौटुंबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचे आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पाच गाड्यांचे नंबर आणि प्रत्येक गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्तीची नावेही यावर आहेत. प्रत्यक्षात वाधवान कुटुंब आणि त्यांची मित्र मंडळी असे 23 जण फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं समोर आलं आहे.

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला पर्यटनासाठी मेहरबानी, प्रधान सचिवांना सक्तीची रजा, गृहमंत्र्यांची कारवाई

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी देश लॉकडाऊनमध्ये असताना वैद्यकीय उपचार किंवा जवळच्या व्यक्तीचे निधन अशा अपवादात्मक कारणासाठी प्रवासाला सूट दिली जाते. परंतु सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजवत मौजमजेसाठी वाधवान कुटुंब महाबळेश्वरला गेल्याचं समोर आल्याने टीकेची झोड उठली आहे. (Wadhawan Family FIR and Quarantine in Panchgani)

वाधवान कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात

‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’चे (डीएचएफएल) संस्थापक कपिल आणि धीरज वाधवान बंधूंचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि ‘येस बँके’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे. मिर्ची प्रकरणात त्यांना फेब्रुवारी महिन्यात जामीन मिळाला. तर येस बँक प्रकरणी तपास अद्याप सुरु आहे. तपास सुरु असतानाच वाधवान बंधूंनी मुंबईबाहेर पळ काढल्याने आणि त्यातही संचारबंदीच्या काळात प्रवास केल्याबद्दल ईडीने त्यांना परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

वरदहस्ताशिवाय अधिकारी मंजुरी देणे अशक्य आहे. अधिकाऱ्यांना परिणामांची जाणीव असते, ते अशी घोडचूक करणारच नाहीत, असं म्हणत विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

तर, पॅरोलवर बाहेर असलेले कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोपी ‘DHFL’ समुहाच्या वाधवान कुटुंबीयांना CBI च्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्याने विशेष सवलत दिली. गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करुन त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Wadhawan Family FIR and Quarantine in Panchgani)

Published On - 9:38 am, Fri, 10 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI