Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत एकत्र येणार का? उद्धव ठाकरेंनी अखेर सस्पेन्स संपवला, म्हणाले, आम्ही दोघे…
छत्रपती संभाजी नगरमधील हंबरडा मोर्चात उद्धव ठाकरे हे सहभागी झाले होते. या मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच आज छत्रपती संभाजी नगरमध्ये हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहभागी झाले होते. या मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना, मराठी अस्मितेसाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. आता शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता याची सुरुवात झाली आहे. जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असलं तरी मी इशारा मोर्चा म्हटलेलं आहे. शेतकरी जो आक्रोश करतोय, तो आक्रोश या सरकारच्या कानावर पडूनसुद्धा सरकारचे कान बंद झाले असतील तर सरकारचे कान उघडण्याचे काम शिवसेना करेल. आम्ही दोघे जरूर एकत्र येऊ. महाराष्ट्रातील प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघेही एकत्र येऊ.’
दिवाळीच्या आधी पॅकेज द्या – उद्धव ठाकरे
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही धार्मिक भावनेवर राजकारण करत आहात. जीव चालला आहे. त्यावर काहीच करत नाही. दिवाळी आधी जिल्ह्यात जायचं. पॅकेज येतं की नाही. विरोधी पक्षनेतेपद नसलं तरी अधिकारी आलाच पाहिजे. शेतकरी सोबत आहे. अधिकारी आला नाही तर शेतकऱ्यांचा आसूड काय असतो तो दाखवला पाहिजे. तुम्ही बाबूगिरी करू नका. शिवसेना पॅकेजवर लक्ष्य ठेवेल. दिवाळीच्या आधी पॅकेज द्या. मी दिवाळीनंतर महाराष्ट्रात फिरणार. प्रत्येकाला पैसे मिळाले की नाही हे बघेल. हाच शिवसेनेचा कार्यक्रम असेल. जा गावागावात जा. शेतकऱ्यांना पॅकेज मिळवून द्यायला तयार आहे. आम्ही हे करायला तयार आहे. मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे.
पंतप्रधांनांनी एक अवाक्षर काढलं नाही – उद्धव ठाकरे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जमिनी पूर्ववत करा. कर्जमाफी द्या. हप्ते थांबवले तरी त्यात वाढ होईल. सरकारने पालकत्वाची जबाबदारी घ्यावी. पंतप्रधांनांनी एक अवाक्षर काढलं नाही. जिथे गेला तिथे विमानतळ आहे. पण शेतकरी आहे. पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे. तज्ज्ञांनी पॅकेजची पोलखोल केली आहे. हे फसवं पॅकेज आहे. इतिहासातील सर्वात मोठी थाप सरकारने मारली आहे.’
