गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस कोण? सारंगी महाजन यांचं मोठं विधान, पुन्हा वातावरण तापणार?
बीडच्या महाएल्गार सभेमध्ये बोलताना धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचा उल्लेख छगन भुजबळ यांनी केला होता, त्यावर आता सारंगी महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

बीडमध्ये काही दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली होती, या सभेमध्ये बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून त्यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला होता, त्यानंतर भुजबळांच्या या वक्तव्याची राज्यभरात चांगलीच चर्चा सुरू आहे.
यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळ यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला, भुजबळ चुकीचं बोलत आहेत, धनंजय मुंडे नाही तर पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या राजकीय वारस आहेत, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे मात्र करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात वारसा हा जन्माने नाही तर विचाराने मिळतो, मी धनंजय मुंडे यांचा संघर्ष 2009 पासून बघत आले आहे, असं त्यांनी म्हटलं. तर टीपी मुंडे यांनी आपणच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यावर आता सारंगी महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सारंगी महाजन?
प्रकाश महाजन जे तुम्हाला बोलले आहेत ते पूर्णपणे वेगळं आहे, वारसदार पंकजा मुंडे होऊ शकत नाहीत, बीडची जनता असू शकते वारसदार, पण मुंडे नाव आहे म्हणून हे वारसदार आहे, असं होऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या नखाची सर देखील यांच्यात नाही. जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, जे प्रामाणिकपणे काम करतात ते देखील खरे वारसदार असू शकतात, असं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल म्हटलं की, पंकजा मुंडे या लहान असताना माझ्य संपर्कात असायच्या, त्यावेळी त्या खूप चांगल्या होत्या, मला त्यांचा स्वभाव आवडायचा, आज पण चांगल्याच आहेत, पण त्यांचा स्वभाव आता असा कसा झाला हे मला माहीत नाही, असंही यावेळी सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.
