शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुनावणी, ही दोन कलमं संपूर्ण गेम फिरवणार, असीम सरोदे यांनी काय सांगितलं?
आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रदीप कापसे, प्रतिनिधी : आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आज आठव्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे आज सुप्रीम कोर्टात अर्धातास युक्तिवाद करणार आहेत. या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सरोदे?
त्यावेळी शिवसेना पक्षातीलच काही लोकांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं. त्यामुळे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी बैठक बोलावली होती. म्हणजे 21 जून 2022 ची ही जी काही कृती आहे, पक्षादेश डावलून भाजपचा उमेदवार जिंकावा यासाठी मतदान करायचं, ही पक्षविरोधी कारवाई आहे. मग ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केली, ते अपात्र आहेत. हे इतकं साधं गणित आहे, पक्षांतर बंदी कायद्याचं. तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडू येतात, तेव्हा तुम्ही काही गोष्टी या करू शकत नाहीत. मात्र ती कृती एकनाथ शिंदे आणि काही लोकांनी केली, त्यामुळे ते तिथेच 21A नुसार अपात्र ठरले, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, सेक्शन 29 A अनुसार निवडणूक आयोगाकडे जो रजिस्टर असलेला जो पक्ष असेल त्या पक्षाचे जे प्रमुख असतील आणि त्यामध्ये नेतृत्वाच स्ट्रक्चर सांगितलेलं असेल तेच मान्य करायचं, मग विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फक्त एवढंच पहायला पाहिजे होतं. की त्यावेळी त्या पक्षाचे प्रमुख कोण होते? कोणाच्या सहिने सर्व उमेदवार उभे राहिले होते, हे सर्व पाहिले पाहिजे असं देखील यावेळी असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
