
राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेते एकमेकांवर सडकून टीका करताना पहायला मिळत आहेत. सत्ताधारी नेते विकासावर मत मागत आहेत, तर विरोधी पक्षांतील लोक सत्ताधाऱ्यांच्या कारभारांवर आरोप करताना पहायला मिळत आहेत. अशातच आज लातूरमध्ये MIM पक्षाच्या वतीने प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी भाजपर सडकून टीका केली आहे. ओवैसी यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
असदुद्दीन ओवैसींनी सभेनंतर पत्रकाराशी बोलताना म्हटले की, भाजपाच्या लोकांना मी विचारतो की, तुम्ही डोनाल्ड ट्रंप यांना का घाबरता? ट्रम्प यांचे नाव घेतले की तुम्ही थंड होवून जाता. ट्रम्प विमानात उभे राहून सांगतात की, मोदी चांगले व्यक्ती आहेत मात्र ते मला खुश करण्यासाठी काही गोष्टी करतात. त्यांनी असे विधान करून 24 तास उलटून गेले, मात्र भाजपच्या कुणीही पुढे येऊन उत्तर दिलेले नाही. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा पंतप्रधान असतो, तो कोण्या एका समाजाचा नसतो त्यांची प्रतिष्ठा ही देशाची प्रतिष्ठा आहे. तुम्ही कधी बोलणार? असा सवाल खासदार ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापले आहे. यावर बोलताना औवेसी यांनी म्हटले की, विलासराव देशमुखांच्या काळात अनेक चांगली कामे झाली आणि काही चुकीची देखील कामे झाली. मात्र ते आता हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलणं योग्य नाही. त्यांच्याच काळात मुंबई रेल्वे ब्लास्ट आणि मालेगावची घटना घडली, त्यामध्ये काही निर्दोष लोक पकडले गेले. असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान पार पडणार आहे. या महापालिकेत एकूण 18 प्रभाग असून यातून 70 सदस्यांना महापालिकेवर निवडून जाणार आहेत. तर एकूण 3 लाख 21 हजार 354 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात महिला मतदार सव्वा लाख आणि पुरुष मतदारही दीड लाखाच्या आसपास आहेत.