2 डिसेंबरनंतर महायुतीमध्ये फूट पडणार? जर आम्हाला अडचण झाली तर..,भाजपच्या मंत्र्याचं सर्वात मोठं वक्तव्य
निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून पैसे वाटपाचा आरोप केल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये संघर्ष वाढल्याचं दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या मंत्र्याकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. प्रचार रंगात आला असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकत मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता, त्यामुळे देखील भाजपमध्ये नाराजी आहे.
दरम्यान यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी यावर बोलणं टाळलं, मात्र यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं ते म्हणजे दोन डिसेंबरपर्यंत मला युती टीकवायची आहे, असं ते म्हणाले आहेत. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर आता दोन डिसेंबरनंतर महायुतीमध्ये फूट पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना आता भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गणेश नाईक?
रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते बोलताना चुकून बोलले असतील त्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. राज्याच्या जनतेचा विकास करायचा आहे, जनतेची कामं करण्यासाठी भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. गाडीमध्ये बसताना आम्हाला अडचण झाली तरी सुद्धा आम्ही अॅडजेस्ट करू, उद्या तुम्ही आम्हाला जर ढकलणार असाल, तर आम्ही पुढे कोण कोणाला ढकलेल ते बघू, असं यावेळी नाईक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यात सध्या बिबट्याची संख्या वाढली आहे, यावर देखील यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे, त्यांचं नियमन करण्याची योजना केंद्र सरकारच्या वन खात्याने मंजूर केली आहे. त्यादृष्टीने प्रयोग केले जातील, ते यशस्वी झाल्यानंतर समतोल राखून त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असं नाईक यांनी म्हटलं आहे.
