Manikrao Kokate : माझ्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि मला पाठवा !… तरुण शेतकऱ्याची थेट कोकाटेंना मनीऑर्डर
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढत असताना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात रमी खेळण्याचे आरोप आहेत. निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीतील नुकसानाचे पैसे कोकाटे यांना पाठवत त्यांना रमी खेळून मदत करण्याची विनंती केली आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असतानाच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मात्र शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करण्यात आणि सभागृहात बसून ऑनलाइन रमी (पत्ते) खेळण्यात व्यस्त आहेत. कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याचे अनेक आरोप लागले असून त्यामुळे ते प्रचंड चर्चेत असून विरोधकांनी त्यांच्याविरोधात रान पेटवलं आहे. त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून आणि सर्वसामान्य लोकांकडून देखील मागणी करण्यात येत आहे. मात्र कोकाटे यांनी याप्रकरणात हात वर करत मी रमी खेळलो नाही, मला येतच नाही असे म्हणत आरोप फेटाळून लावले होते. एवढंच नव्हे तर मी राजीनामा देण्यासारखं काय केलं आहे, कोणाचा विनयभंग केला का, असा उन्मत्त सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यात संतापाचे वातावरण असून कोकाटे यांच्याविषयी नाराजी वाढलेली आहे. असं असतनाच आता एका तरूण शेतकऱ्याने अनोखं पाऊल उचलत थेट कोकाटे यांनाचा मनीऑर्डर पाठवत त्यांना साकडं घातलं आहे.
निफाड तालुक्यातील देवगाव येथील तरुण शेतकऱ्याने 5550 रुपयांची मनीऑर्डर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवली असून ‘माझ्यासाठी रमी खेळा’ काहीतरी जिंका आणि मला पाठवा!’’.. असं साकडं गाठलं आहे. सध्या सगळीकडे त्याच तरूणाची चर्चा सुरू आहे.
काय आहे प्रकरण ?
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पूर्व भागातील देवगाव येथील योगेश राजेंद्र खुळे या तरुण शेतकऱ्याने शेतात पाणी साचल्याने आणलेले सोयाबीनचे बियाणे पेरता आले नाही. त्यामुळे पडून असलेले सोयाबीनचे बियाणे त्याने विकले. आणि त्यानंतर त्या तरूणाने थेट राज्याचे कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे यांनाच वेगळ्या पद्धतीने साकडे घातलं आहे. बियाणं विकल्यानंतर त्याने त्याच्यकडे 5550 रुपये हे मनीऑर्डरने कृषिमंत्री कार्यालय, मुंबई येथे पाठवले असून ‘‘हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा,’’ अशी विनंती केली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
काय म्हणाला योगेश खुळे ?
योगेश खुळे याने शेतजमिनीत पेरणीसाठी 5550 रुपयाचं बियाणं घेतलं होतं.पण सतत पाऊस पडल्याने जमीनीत पाणी साचलं आणि जमीन नापीक झाली. त्यामुळे त्याला बियाण पेरताचं आलं नाही. शेतकऱ्यांचे हाल होत असताना कोकाटे यांचा सभागृहातील रमी खेलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. पेरणी न झाल्याने हवालदिल झालेल्या योगेश खुळेने उपरोधिक व्हिडीओ टाकत कोकाटेंना संदेश दिला आहे.
मला सांगताना शोकांतिका वाटत्ये की मी कृषीमंत्री कोकाटे यांच्या जिल्ह्यातील शेतकरी बोलतोय. शेत पूर्ण ओलं झालंय. ही माझी एकट्याची नव्हे, तर शेकडो शेतकऱ्यांची समस्या आहे. अति पावसामुळे आणि नापीक जमिनीमुळे कुठलही पीक उगवत नाहीये, पेरणी करूच शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपल्या राज्याचे कृषीमंत्री, ज्यांना या गोष्टीचं कोणत्याही प्रकारे गांभीर्य नाही. संसद भवनात शेतकऱ्यांच्या समस्या मांडायच्या सोडून, ते जंगली रमी खेळण्याच व्यस्त आहे. त्यामुळे मी सोयाबीन पेरणीसाठी जे बियाणं घेतलं होतं, ते बियाणं आता मी दुसऱ्यांना विकलं आहे. त्याचे आलेले 5 हजार 550 रुपये ते मी कोकाटे साहेब यांना मनीऑर्डरद्वारे पाठवले आहेत. आता राज्याच्या कृषीमंत्र्यांकडून मला एकच अपेक्षा आहे की, त्यांनी मी पाठवलेल्या पैशांतून रमीचा एक डाव खेळावा आणि त्यामधून काही जिंकून मला पैसे मिळवून द्यावेत. कारण आता माझ्याकडे उत्पन्नाचं कोणतही साधन राहिलेलं नाही’ अशा उपरोधिक शब्दांत त्या तरूणाने कोकाटे यांना टोला लगावला आहे.
