भाजपचा मोठा निर्णय, मुंबई महापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत महापौरपदाची (Mumbai mayor election) शर्यत सुरु झाली आहे.

भाजपचा मोठा निर्णय, मुंबई महापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही

मुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुरु असताना, तिकडे महापालिकेतील महापौर (Mumbai mayor election) निवडणुकीत रंगत आली आहे. राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत महापौरपदाची (Mumbai mayor election) शर्यत सुरु झाली आहे. मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्याने, भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे.

आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. असं असलं तरी 2022 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर असेल, असा दावाही खासदार मनोज कोटक यांनी केला. याशिवाय भाजप आमदार आशिष शेलार यांनीही आपण तुल्यबळ आहोत मात्र आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधी विचारांच्या जीवावर अभद्रता करणार नाही, असं ट्विट केलं आहे.

मुंबई महापालिकेत महापौर निवडणुकीत सेनेला धक्का देणार अशी चर्चा होती. पण आता  या निवडणुकीत भाजप आपला उमेदवार देणार नाही हे स्पष्ट झालं आहे. राज्यात अजून शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत समीकरण जुळलेलं नाही. त्यामुळे भाजपची वेट अँड वॉचची भूमिका कायम  आहे.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी सध्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचं नाव जवळपास निश्चित आहे. पण ‘मातोश्री’ नेहमी ऐनवेळी नाव बदलत असते, त्यामुळे जोपर्यंत नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत नाव निश्चित मानलं जात नाही.

काँग्रेस उमेदवार देणार?

एकीकडे भाजपने उमेदवार देण्यास नकार दिला असला, तरी दुसरीकडे शिवसेनेचा नवा मित्रपक्ष काँग्रेसने मात्र उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची दाट शक्यता आहे. महासेनाआघाडीच्या चर्चा सुरु असल्या तरी मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधीपक्षाच्या भूमिकेतच राहणार आहे. दुपारी 3 वा. महापालिकेत सर्व काँग्रेस नगरसेवकांना बोलावण्यात आले आहे. विरोधीपक्षाची भूमिका म्हणून काँग्रेस आपला अर्ज दाखल करणार आहे. मात्र, दिल्ली हायकमांडने आदेश दिल्यास काँग्रेस दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे देखील घेऊ शकते.

आरक्षण सोडत

राज्य नगरविकास विभागाकडून राज्यातील एकूण 27 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या पुढील पदावधीबाबतच्या आरक्षणाची सोडत काढली जाते. 2017 मध्ये महापालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अडीच वर्षाची मुदत 8 सप्टेंबरलाच संपली होती. मात्र विधानसभा निवडणुकांमुळे महापौरपदाचा कालावधी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला. अखेर मुंबई महापालिका महापौरपदाचं खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं. त्यामुळे इच्छुकांनी (Mumbai Mayor Candidates) पक्षश्रेष्ठींकडे भाऊगर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

बीएमसीतील संख्यागणित –

  • शिवसेना – 94
  • भारतीय जनता पार्टी – 83
  • काँग्रेस – 29
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 8
  • समाजवादी पार्टी – 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

मुंबई महापालिकेतील चित्र

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी नाही. मात्र, भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याने भाजपने बीएमसीत महापौर पदावर दावा केला नव्हता. शिवसेनेला मुंबई महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपनं शिवसेनेला मदत केली होती. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई महापौरपद कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला भाजपने आव्हान दिल्यास इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र आता भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या  

मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यतीत कोण कोण? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *