महिनाभरात राज्यातील 15-17 हजार रिक्त पदं भरणार : राजेश टोपे

पुढील 1 महिन्याच्या आत राज्यातील 15-17 हजार रिक्त जागांची पदं भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे (Rajesh Tope annouce new job recruitment).

महिनाभरात राज्यातील 15-17 हजार रिक्त पदं भरणार : राजेश टोपे

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (25 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी काळात 1 महिन्याच्या आत राज्यातील 15-17 हजार रिक्त जागांची पदं भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे (Rajesh Tope annouce new job recruitment). यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासोबतच कोरोनावरील औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, “रिक्त पदांचं आश्वासन आम्ही दिलं आहे. त्या भरतीचं धोरण ठरवण्यावर काम सुरु आहे. पूर्वी झालेल्या एकत्रित परीक्षांच्या गुणांवरुन काही पदं भरता येतील का यावर विचार सुरु आहे. कोणत्या पदांसाठी मुलाखती घ्याव्या लागतील यावर धोरण ठरवण्याची प्रक्रिया झाली आहे. पुढील महिन्याभराच्या आत आपल्या सर्व 15-17 हजार पदं भरण्याचं काम केलं जाईल.”

“यानिमित्ताने मला महाराष्ट्राच्या जनतेला हेच सांगायचं आहे की पुढील काळात आपल्याला सतर्क राहायचं आहे. पंतप्रधानांनी अनलॉक करण्याची भाषा केली आहे. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत शाळा सुरु कराव्या लागतील. त्यासाठी आपल्याला स्वच्छतेचे नियम पाळावे लागतील. लहानग्यांनी आणि वयोवृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अशी हात जोडून विनंती. ऑनलाईन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शिक्षणाचं काम सुरुच ठेवावं,” असंही त्यांनी नमूद केलं.


“मुंबईकरांनो खासगी रुग्णवाहिकांना बोलावू नका, ते लुटतील, सरकारी रुग्णवाहिकांची सेवा घ्या”

राजेश टोपे म्हणाले, “मुंबईत दोनच विषय होते. बेडची अपुरी व्यवस्था होती, मात्र आपण मोठ्या प्रमाणात अतिदक्षता बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईकरांनी 650 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करावा. खासगी रुग्णवाहिकांना बोलावू नका, ते लुटतील. 1916 या आपतकालीन सेवेचा उपयोग करुन सरकारी रुग्णवाहिकांची सेवा घ्या. शहरांमधील आरोग्यावर लक्ष देण्यासाठी शहरांसाठी स्वतंत्र आरोग्य संचालकाचं पद तयार करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य केवळ ग्रामीण भागापुरतं मर्यादित न ठेवता शहरांमध्ये देखील सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी हे पद असेल. येणाऱ्या दोन दिवसात याबाबत तुम्हाला बदल दिसेल.”

“फक्त श्रीमंतांसाठीच उपलब्ध असलेली कोरोनावरील औषधं सामान्यांसाठीही आणणार”

“फक्त श्रीमंतांसाठीच उपलब्ध असलेली कोरोनावरील औषधं आपण महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी भारतातील औषध कंपन्यांना परवानगी दिली आहे. जूनच्या अखेरपर्यंत ही औषधं मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येतील. यासोबतच राज्यात मुबलक प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्राला विनंती केली आहे. वैद्यकीय पदव्यूत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी परीक्षांची तयारी करत आहेत. ते अशी तयारी करत बसले तर या डॉक्टरांची सेवा रुग्णांना उपलब्ध होणार नाही. त्यामुळे केंद्राला त्यांची परीक्षा 5-6 महिने पुढे ढकलण्याची किंवा मागील गुणांवरुन मुल्यांकन करण्याची विनंती केली आहे. रुग्णालयांमधील काम हेच इंटर्नशिप समजावी असंही सांगितलं. हा केवळ एका राज्यासाठी नाहीतर संपर्ण देशासाठी निर्णय घेण्याची विनंती केली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Maharashtra Cabinet Decision : आशा सेविकांचं मानधन 3 हजारांवर, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे 12 निर्णय

Salon and Gym | सलून सुरु करण्यास परवानगी, केवळ केस कापता येणार, दाढी नाही!

Rajesh Tope annouce new job recruitment

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *