Ayodhya Rohit Pawar : सारनाथनंतर आज रोहित पवार अयोध्येत; राष्ट्रवादीलाही हिंदुत्वाचे वेध? फेसबुक पोस्टनंतर रंगू लागली चर्चा

एकीकडे राज्यातील मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्या दौऱ्याच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे कोणतीही घोषणा किंवा गाजावाजा न करता रोहित पवार अयोध्येला जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ayodhya Rohit Pawar : सारनाथनंतर आज रोहित पवार अयोध्येत; राष्ट्रवादीलाही हिंदुत्वाचे वेध? फेसबुक पोस्टनंतर रंगू लागली चर्चा
सहकुटुंब उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांच्या दौऱ्यावर रोहित पवार
Image Credit source: Facebook
प्रदीप गरड

|

May 07, 2022 | 10:41 AM

अयोध्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, रोहित पवारांच्या अचानक अयोध्या दौऱ्याची (Ayodhya) राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीलाही आता हिंदुत्वाचे वेध लागले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर त्यांनी एक फेसबुक पोस्टही केली आहे. रोहित पवार सध्या चार दिवसांसाठी तीर्थयात्रेवर आहेत. रोहित पवार सहकुटुंब उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातील सारनाथला (Sarnath) त्यांनी काल भेट दिली. ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचे वास्तव्य होते, त्या सारनाथमध्ये काल रोहित पवार होते. या चार दिवसात ते उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत. यानुसार आज दुपारी ते अयोध्येत असतील. विशेष म्हणजे एकीकडे राज्यातील मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्या दौऱ्याच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे कोणतीही घोषणा किंवा गाजावाजा न करता रोहित पवार अयोध्येला जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हटले फेसबुक पोस्टमध्ये?

हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र कोणते असेल तर ते गंगा नदीच्या तीरावर वसलेले वाराणसी. मुक्ती आणि शुद्धीकरणासाठी देशभरातून असंख्य भाविक इथे नियमित येत असतात. वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आम्हीही वाराणसीमध्ये आलो. वाराणसी हे हिंदू धर्मासाठी सात पवित्र शहरांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ आहे. प्रसिद्ध संत कबीर यांचीही जन्मभूमी वाराणसी आहे. इथे अनेक विशाल मंदिरांव्यतिरिक्त, घाट आहेत. हे स्थळ केवळ भारतीयांसाठीच नाही तर परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचंही केंद्रबिंदू आहे, असे त्यांनी म्हटले. या पोस्टमध्ये त्यांनी इतिहासाचा आढावा घेतला आहे.

गाजावाजा नाही

राष्ट्रवादीचे आमदार असलेले रोहित पवार यांनी आपल्या अयोध्यादौऱ्याचा कोणताही गाजावाजा केला नाही. याउलट या चार दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याचे अपडेट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. उत्तर प्रदेशात अनेक धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळे आहेत. यातील काही ठिकाणांना ते भेटी देत आहेत. सारनाथनंतर आज ते अयोध्येत आहेत. दरम्यान, रोहित पवार अचानक अयोध्या दौऱ्यावर कसे, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. कारण मनसे, शिवसेना, भाजपा यांचे अयोध्या आणि राममंदिरावरून राजकारण सुरू असताना अचानक रोहित पवारांनी कोणतीही घोषणा किंवा गाजावाजा न करता रामाचे दर्शन घेण्याचे ठरवले. त्यामुळे राष्ट्रवादीही आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण मागे नसल्याचे तर सांगत नाही ना?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें