Plane Crash : पिंकी कशी बनली एअर होस्टेस; वडिलांनी सांगितली लेकीच्या संघर्षाची कहाणी
विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबतच फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही मृत्यू झाला. पिंकीचं तिच्या वडिलांशी मंगळवारी संध्याकाळी शेवटचं बोलणं झालं होतं. टीव्हीवर जेव्हा अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी पाहिली, तेव्हा त्यांना मुलीच्या निधनाबद्दल समजलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उत्तरप्रदेशातील जौनपूर इथली फ्लाइट अटेंडंड पिंकी माली हिचाही बारामतीतील विमान अपघातात मृत्यू झाला. पिंकी गेल्या पाच वर्षांपासून चार्टर्ड फ्लाइट्समध्ये काम करत होती. तिचं मंगळवारी शेवटचं वडिलांशी बोलणं झालं होतं. पिंकीच्या निधनाने तिच्या वडिलोपार्जित गावात शोककळा पसरली आहे. विमान अपघाताची बातमी मिळताच नातेवाईक आणि शेजारी तिच्या वरळी इथल्या फ्लॅटबाहेर जमले. बारामतीत बुधवारी सकाळी अजितदादांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केलं. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळलं आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी संध्याकाळी वडील शिवकुमार माळी यांचं त्यांची मुलगी पिंकी मालीशी शेवटचं बोलणं झालं होतं. ते म्हणाले, “तिने मला सांगितलं होतं की ती अजित पवारांसोबत बारामतीला जाणार आहे आणि तिथून नांदेडला जाणार आहे. ती सकाळी लवकर निघून गेली. टीव्हीवर अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आली तेव्हा मला या घटनेची माहिती मिळाली. ब्रेकिंग न्यूजमध्ये माझ्या मुलीचं नाव आलं तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही तिला गमावलं आहे.” पिंकी विवाहित होती आणि पतीसोबत ती पुण्यात राहत होती. पिंकीचा पती एक खाजगी कंपनी व्यवस्थापक म्हणून काम करतो.
पिंकीचे वडील शिवकुमार माली हे एकेकाळी दिल्ली विमानतळावर ड्रायक्लीनर म्हणून काम करत होते. 1989 मध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली होती. पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या विमानाची योग्यरित्या स्वच्छता न केल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. या घटनेनंतर त्यांची मुलगी पिंकीने फ्लाइट अटेंडंट किंवा एअर हॉस्टेस बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. शिवकुमार यांनी सांगितलं की ते अनेकदा त्यांच्या कामाबद्दलची घटना मुलीला सांगायचे, तेव्हा ती त्यांना आश्वासन द्यायची की, “मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन.”
पिंकीच्या कुटुंबात तिची बहीण प्रिती आणि भाऊ करण माली यांचा समावेश आहे. हे दोघं मुंबईत राहतात. तर तिचे काका चंद्रसेन माली आणि काकी भैंसा गावात राहतात. या दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थ गावातच्या तिच्या घरी पोहोचले. यावेळी सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते.
