American Tariff : भारतावरचा टॅरिफ ट्रम्प मागे घेणार? पुढच्या चार तासांमध्ये मोठी घोषणा, अमेरिकेत नेमकं काय घडतंय?
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, या टॅरिफचा मोठा फटका हा सध्या भारताला बसत आहे, अमेरिकेसोबतची निर्यात देखील कमी झाली आहे, मात्र पुढील काही तासांमध्ये आता मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, गेल्या ऑगस्ट महिन्यापासून अमेरिकेकडून नव्या टॅरिफ धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा मोठा फटका हा भारताला बसला आहे, दरम्यान भारत हा एकमेव देश नाहीये की, ज्यावर अमेरिकेनं टॅरिफ लावला आहे, अमेरिकेनं भारत, ब्राझील यांच्यासह अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. या टॅरिफमुळे अमेरिकन सरकारचं उत्पन्न तर वाढलं आहे, मात्र दुसरीकडे टॅरिफमुळे अमेरिकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे, अनेक जीवनावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत. वस्तूंचा पुरवठा होत नसल्यानं तेथील उद्योजक आणि ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आज टॅरिफच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प सरकारविरोधात अमेरिकेच्या हाय कोर्टात जी याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर आजा न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
आता हा निर्णय येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही विविध देशांवर 5 टक्के, 10 टक्के, 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्याविरोधात अमेरिकेतल्या हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेमध्ये असा दावा करण्यात आला होता की, अशा पद्धतीने टॅरिफ लावण्याचा अधिकार हा देशाच्या राष्ट्रपतींना नाहीये, दरम्यान यावर आता सुनावणी पूर्ण झाली असून, आज यावर न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
दरम्यान हा निर्णय जर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गेला आणि कोर्टानं म्हटलं की अशा पद्धतीने लावला गेलेला टॅरिफ हा अवैध आहे, तर ट्रम्प प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागणार आहे, अशा परिस्थितीमध्ये भारतासह सर्व देशांवरील टॅरिफ देखील मागे घेतला जाऊ शकतो. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्म यांनी लावलेल्या टॅरिफमुळे आयातदारांचं जेवढं नुकसान झालं आहे, ती सर्व नुकसान भरपाई ट्रम्प प्रशासनाला द्यावी लागणार आहे.
परंतु हा निर्णय जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने लागला तर मात्र टॅरिफ आणखी वाढू शकतो, ट्रम्प एखादा मोठा डाव खेळू शकतात, आधीच त्यांनी 500 टक्के टॅरिफच्या प्रस्तावाला मंजूरी देखील दिली आहे. त्यामुळे जर हा निर्णय ट्रम्प यांच्या बाजूने लागला तर अनेक देशांना टॅरिफचा मोठा दणका बसू शकतो.
