स्पायवेअरचा हल्ला, WhatsApp तातडीने अपडेट करा

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 16:00 PM, 14 May 2019
स्पायवेअरचा हल्ला, WhatsApp तातडीने अपडेट करा

मुंबई : WhatsApp वर इस्त्रायली स्पायवेअरचा हल्ला झाला आहे. याला WhatsApp ने देखील दुजोरा दिला आहे. हा हल्ला इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न एनएसओ ग्रुपकडून (NSO Group) करण्यात आल्याचा आरोप आहे. या स्पायवेअरने अँड्रॉईडसह आयफोनलाही प्रभावित केले आहे. त्यामुळे WhatsApp ने युजर्सला अॅप तातडीने अपडेट करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

WhatsApp कॉल केल्यानंतर संबंधित स्पायवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो आणि माहितीची चोरी करतो. मागील काही काळात फेसबूकला अनेक सायबर हल्ल्यातून जावे लागले आहे. मात्र, एखाद्या सरकारच्या गुप्तहेर संस्थेकडून WhatsApp वर हल्ला होण्याची ही घटना वेगळी आहे. WhatsApp वरील संवाद गुप्त ठेवता येत असल्याने (end to end encryption) जगभरात सरकार आणि सुरक्षा अधिकारी WhatsApp चा वापर करतात. WhatsApp ने याबाबत मानवाधिकार संस्थांनाही माहिती दिली. इस्त्रायल सरकारसोबत स्पायवेअरचे काम करणाऱ्या खासगी संस्थेने हा हल्ला केल्याचे तपासात उघड झाल्याचे WhatsApp ने सांगितले आहे. हे स्पायवेअर आपोआप मोबाईलमधील सिस्टमचे नियंत्रण घेते.

आम्ही याबद्दल अनेक मानवाधिकार संस्थांना माहिती दिली आहे. तसेच याची माहिती नागरिकांना देण्याचेही प्रयत्न सुरु असल्याचे कंपनीने म्हटले. WhatsApp ची तांत्रिक टीम सुरक्षेतील या चुका दुरुस्त करण्यासाठी मागील महिन्यापासून काम करत आहे. मोबाईमधील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी WhatsApp ने मोबाईल युजर्सला आपल्या मोबाईलची ऑपरेटींग सिस्टीम देखील अद्यायावत ठेवण्यास सांगितले आहे.

दरम्यान, सोमवारी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे, “आम्ही इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाला न्यायालयात खेचण्यासाठी कायदेशीर मदत घेत आहोत. तसेच त्यांच्याशी संलग्न एनएसओ संस्थेचा परवाना रद्द करण्याचीही मागणी केली आहे. या कंपनीच्या स्पायवेअरचा जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांवर दुरुपयोग झाला. तेल अविव येथील जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेत 30 पेक्षा अधिक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी इस्त्राईल संरक्षण मंत्रालयावर त्यांच्याशी संलग्न कंपनीला माहिती चोरीसाठी एनएसओ या संस्थेला मुभा दिल्याचे म्हटले आहे.