ढाकात दुर्गादेवी मंदिरातील तोडफोडीनंतर भारत संतापला, मोहम्मद युनूस सरकारला कठोर शब्दांत फटकारले
भारत बांगलादेशसोबत सर्व मुद्द्यांवर शांततापूर्ण आणि सकारात्मक वातावरणात चर्चा करण्यास तयार आहे. बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे दडपशाही रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे, असे भारताने म्हटले आहे.

बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर अल्पसंख्याकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. मंदिर, चर्चमध्ये तोडफोड केली जात आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशातील अल्पसंख्याक असुरक्षित बनले आहेत. राजधानी ढाका येथे दुर्गा मंदिराची तोडफोड करण्यात आली. भारताने या घटनेवर तीव्र निषेध नोंदवला. भारताने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि धार्मिक स्थळांच्या संरक्षणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हल्ले रोखण्यात सरकार अपयशी
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, हिंदू समुदाय आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारची जबाबदारी आहे. भारत बांगलादेशसोबत सर्व मुद्द्यांवर शांततापूर्ण आणि सकारात्मक वातावरणात चर्चा करण्यास तयार आहे. बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे दडपशाही रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारताने यापूर्वी अनेक वेळा अंतरिम सरकारवर टीका केली आहे.
सरकारने सुरक्षा दिली नाही
ढाका येथील दुर्गा मंदिर पाडल्याबद्दल जयस्वाल यांनी बांगलादेशी अधिकाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, जिहादी लोक ढाका येथील खिल खेत येथील दुर्गा मंदिर पाडण्याचा प्रयत्न करत होते, हे सरकारला माहीत होते. त्यानंतरही मंदिराला सुरक्षा दिली नाही. उलट अंतरिम सरकारने या घटनेला बेकायदेशीर जमिनीचा वापर केला, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशात या पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल आम्हाला निराशा आहे.
१९९६ च्या गंगा पाणी कराराचे नूतनीकरण करण्यासाठी भारत आणि बांगलादेशमध्ये चर्चा सुरू होणार आहे. हा करार सन २०२६ मध्ये पूर्ण होत आहे. त्याबाबत जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नवी दिल्ली सर्व बाबींवर ढाकाशी चर्चा करण्यास तयार आहे. दोन्ही पक्षांसाठी चांगल्या चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करता येईल. दोन्ही देशांतील गंगा पाणी करारावर १२ डिसेंबर १९९६ रोजी झाला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती.
