वेगवेगळे सिमकार्ड, ‘सर’ नावाच्या व्यक्तीशी संपर्क; ठाण्यातील गद्दार रवी वर्माबाबत मोठी अपडेट
ठाण्यातील गद्दार रवी वर्माबाबत मोठी माहिती समोर येत आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड सापडले आहेत.

महाराष्ट्र एटीएस तीन-चार दिवसांपूर्वीच ठाण्यातून रविकुमार वर्माला अटक केली. भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या रवी वर्मावर करण्यात आला. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.
काय नवी माहिती?
आज पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात रवी वर्माला दहशतवाद विरोधी पथकाने हजर केले. दरम्यान, आरोपी रवी वर्माकडे अनेक वेगवेगळी मोबाइल सिम कार्ड असल्याचे समोर आले आहे. तो ‘सर’ नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात होता. या व्यक्तीचे खरे नाव सिंगल असल्याचे समोर आले आहे. पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे? याबाबात माहिती समोर आलेली नाही. तसेच रवी वर्मा हा अजूनही माहिती लपवत असल्याचे संशय पोलिसांना आला आहे. त्यामुळे न्यायालयाकडून रवी वर्माला ३ दिवसांची म्हणजेच ५ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे आरोप?
एटीएसने अटक केलेला रवी वर्मा पाकिस्तानच्या दोन फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता. पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी या दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुकची नावे आहेत. याच फेसबुक अकाऊंटवर रवी वर्माने तब्बल १४ सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाठवली. युद्धनौका तसेच इतर जहाजाची महत्त्वाची माहिती आणि चित्रही बनवून पाकिस्तानला पाठवली होती. नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आरोपी रवी वर्मा तिथल्या युद्धनौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवायचा. त्यानंतर ती संपूर्ण माहिती पायल शर्मा आणि इस्प्रीत या अकाउंटला पाठवायचा. तो ही माहिती ऑडियो आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात समोर आले आहे.
2024 पासून पाकच्या संपर्कात
रवी वर्मा नोव्हेंबर 2024 पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्मा आणि इस्प्रित या खात्यावरून एका प्रोजेक्टसाठी युद्धनौकांची माहिती हवीय अशी मागणी रवी वर्माकडे होत होती. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला रवी वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रितला वारंवार पाठवत होता.
