ऐकावं ते नवलच! बस कंडक्टरने चक्क झाडाचं काढलं तिकीट, कुठे घडली घटना?
एका सरकारी बसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बसमध्ये एका महिला कंडक्टरने बॅगेत ठेवलेल्या झाडाच्या रोपच्याचे जबरदस्तीने तिकीट काढले. यासाठी प्रवासी महिलेला 97 रुपये मोजावे लागले.

तुमच्यापैकी अनेकजण सरकारी बसने प्रवास करत असतील. आता अशाच एका सरकारी बसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रोडवेज बसमध्ये एका महिला कंडक्टरने बॅगेत ठेवलेल्या झाडाच्या रोपच्याचे जबरदस्तीने तिकीट काढले. यासाठी प्रवासी महिलेला 97 रुपये मोजावे लागले. तसेच या कंडक्टरने प्रवासी महिलेला तुम्ही हवी तिथे तक्रार करु शकता असंही सुनावलं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोरखपूरमधील रहिवासी डॉ. जया अरुण या गोरखपूरच्या तारमंडल येथील महाविद्यालयात बी.एड विभागाच्या प्रमुख आहेत. त्या शनिवारी आईला भेटण्यासाठी बस्ती येथे गेल्या होत्या. रविवारी परत येताना त्यांनी बॅगेत झाडांची 3 ते 4 रोपटी घेतली होती. त्या सरकारी बसने गोरखपूरला परत होत्या. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी रोपे सीटसमोर ठेवली.
यानंतर बसच्या महिला कंडक्टरने जया यांनी रोपट्यांचे तिकीट काढायला सांगितले. मात्र जया यांनी याला विरोध केला, तेव्हा कंडक्टर म्हणाली की, ‘मी तुम्हाला जागा दिली आहे, 97 रुपये काढा’ आणि बळजबरीने तिकीट दिले. कंडक्टरने डॉ. जया यांच्याकडून 97 रुपये घेतले आणि म्हटले की, ‘तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तक्रार करू शकता’
तपासानंतर कारवाई होणार
या घटनेनंतर डॉ. जया यांनी जबरदस्ती करणाऱ्या कंडक्टरवर योग्य कारवाईची मागणी केली आहे. याबाबक बोलताना परिवहन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक लव कुमार सिंह म्हणाले की, ‘कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक सामान वाहून नेण्यासाठी कोणतेही तिकीट आकारले जात नाही, जर कंडक्टरने रोपांसाठी तिकीट आकारले असेल, तर आधी चौकशी केली जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.’
