गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. | Colonel Santosh Babu

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:06 PM, 25 Jan 2021
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र
15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यावेळी चिनी सैनिकांनी लोखंडी रॉड आणि काटेरी तारा लावल्या बांबुंच्या साहाय्याने भारतीय सैनिकांवर अचानकपणे हल्ला चढवला होता.

नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू (Colonel Santosh Babu) यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून शौर्यपदक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. (Colonel Santosh Babu who lost his life in Galwan valley clash has been awarded Mahavir Chakra posthumously)

लडाखमध्ये असणाऱ्या पँगाँग सरोवराच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यावेळी चिनी सैनिकांनी लोखंडी रॉड आणि काटेरी तारा लावल्या बांबुंच्या साहाय्याने भारतीय सैनिकांवर अचानकपणे हल्ला चढवला होता. मात्र, कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखालील बिहार रेजिमेंटच्या जवानांनी डगमगून न जाता चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या झटापटीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?

गलवान नदी किनाऱ्यावर भारताच्या हद्दीत चिनी सैन्यांचा एक तंबू होता. बैठकीत चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तो तंबू हटवण्याचा शब्द दिला. या बैठकीदरम्यान 16 बिहार बटालियनचे कमाडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू यांनीदेखील चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या बैठकीनंतर चिनी सैन्याने तो तंबू नष्टदेखील केला. मात्र, 14 जूनच्या मध्यरात्री चिनी सैनिकांकडून त्याचजागेवर पुन्हा तंबू उभारण्यात आला.

चिनी सैन्याच्या या वागणुकीवरुन 16 बिहार रेजिमेंटमध्ये नाराजी होती. चिनी सैनिकांच्या या वर्तवणुकीचा बटालयिनमधील काही तरुण जवानांना राग आला होता. चिनी सैनिकांचा हा तंबू उद्धवस्त करुन टाकावा, असं अनेकाचं मत होतं. मात्र, कर्नल संतोष बाबू यांचा विचार वेगळा होता. या विषयाला संयम आणि शांततेने हाताळावं, अशी त्यांची इच्छा होती.

15 जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्यासह 35 जवानांची टीम पायी चिनी सैन्याच्या तंबूजवळ पोहोचली. तेव्हा त्यांची वागणूक, हावभाव बदलले होते, हे भारतीय सैनिकांच्या लक्षात आलं. याशिवाय या भागात नेहमी तैनात असलेले चिनी सैनिक तिथे नव्हते. चीनने तिथे नव्या सैनिकांना पाठवलं होतं.

जेव्हा कर्नल संतोष बाबू यांनी या भागात पुन्हा तंबू का बनवला? असा प्रश्न विचारला तेव्हा एका चिनी सैन्याने पुढे येत कर्नल संतोष बाबू यांना जोराचा धक्का दिला. यावेळी त्या सैनिकाने चिनी भाषेत अपशब्दांचादेखील प्रयोग केला. त्यानंतर गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. भारतीय सैनिकांच्या प्रतिहल्ल्यात मोठ्याप्रमाणावर चिनी सैनिक मारले गेले होते. मात्र, चीनने मृत सैनिकांचा आकडा कधीच जगासमोर जाहीर केला नाही.

संबंधित बातम्या:

Col. Santosh Babu | एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया

India China Face Off | बिहार रेजिमेंटचे प्रमुख चिनी सैनिकांच्या तंबूत, सूर्यास्तावेळी धक्काबुक्की, आणि… 15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?

(Colonel Santosh Babu who lost his life in Galwan valley clash has been awarded Mahavir Chakra posthumously)