crow life : कावळा किती वर्ष जगू शकतो? वाचून बसेल धक्का
कावळा हा एक प्रचंड हुशार पक्षी आहे, आज आपण कावळ्याबद्दल अशा अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला कदाचित यापूर्वी माहिती नसतील. कावळा हा निसर्ग स्वच्छ ठेवण्याचं काम करतो.

जर तुम्ही जगातील सर्वात हुशार पक्ष्यांबद्दल विचार करत असाल तर त्यामध्ये कावळ्याचा समावेश हा सर्वात आधी होतो. कावळा हा तसा प्रचंड हुशार पक्षी आहे, मात्र तुम्ही जसे इतर पक्षी पाळू शकता तसा कावळा तुम्ही पाळू शकत नाही, त्याची कारणं अनेक आहेत, हा पक्षी प्रचंड आक्रमक असतो, दुसरं म्हणजे तो लवकर हाती लागत नाही आणि पाळण्याचा प्रयत्न केला तर पोपट किंवा इतर पक्ष्यांप्रमाणे तो एका ठिकाणी राहीलच याची देखील शक्यता खूप कमी असते, मात्र याला काही अपवाद देखील आहे, काही ठिकाणी आज तुम्हाला कावळा पाळल्याचं देखील पहायला मिळतं. पालघर जिल्ह्यात एका कुटुंबानं कावळा पाळला आहे, हा कावळा चक्क माणसासारखं बोलतो देखील. त्याचे अनेक व्हिडीओ सध्या बोलणारा कावळा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सांगायचा मुद्दा हाच की कावळा हा प्रचंड चतुर पक्षी असतो. त्याला जर संकटाची चाहुल झाली तर तो एकटा किंवा समूहाने देखील एखाद्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो. त्याच्यामध्ये प्रचंड ताकत असते. तो माणसाला आपल्या हल्ल्यानं जखमी देखील करू शकतो. आज आपण कावळ्याबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या की कदाचित यापूर्वी तुम्ही कधी वाचल्या नसतील किंवा तुम्हाला माहिती नसतील.
कावळा किती वर्ष जगतो?
कावळा हा तसा दीर्घायुषी पक्षी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहिती प्रमाणे कावळा हा जास्तीत जास्त 15 वर्ष जगू शकतो. दहा ते पंधार वर्ष एवढं त्याचं आयुष्य असतं. मात्र याला ऑस्ट्रेलियन कावळे अपवाद आहेत. ते तब्बल 22 वर्ष जगतात, अशी माहिती एका अभ्यासातून पुढे आली आहे.कावळ्याने एकदा अंडी दिली की 18 दिवसांनी त्याच्यामधून पिल्ले बाहेर येतात, आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ते उडण्यास सक्षम होतात.
निसर्गाची स्वच्छता
कावळा हा पक्षी निसर्गाची स्वच्छता करतो, मेलेल्या, कुजलेल्या प्राण्यांचं मांस हेच कावळ्याचं प्रमुख अन्न असतं, त्यामुळे निसर्गाची स्वच्छता देखील आपोआप होते. दरम्यान वाढत्या शहरीकरणाचा परिणाम हा जसा इतर पक्ष्यांवर झाला आहे, तसाच तो कावळ्यांवर देखील झाला आहे, कावळ्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे.
वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, टीव्ही 9 मराठी याबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.
