गहलोत यांची आता दिल्ली वारी, पेच वाढणार की मिटणार?
बुधवारी रात्री उशिरा गहलोत हे सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्या 102 आमदारांचे काय म्हणणे आहे हे सांगतील. मात्र, मुख्यमंत्री पदाचा ते राजीनामा देतील ही शक्यता खाचरियावास यांनी फेटाळून लावली आहे.

मुंबई : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडीवरुन सुरु झालेले अंतर्गत मतभेद हे मिटण्याचे नाव घेत नाहीत. पुढील महिन्यात अध्यक्षपदाची निवड होत आहे पण त्यापूर्वीच राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री हे बुधवारी रात्री दिल्लीमध्ये दाखल होत असून ते अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची देखील भेट घेणार आहेत. ही भेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले जात असले तरी यामध्ये सर्व बाबींवर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सचिन पायलट हे कालपासून दिल्लीतच आहेत. त्यामुळे गहलोत आणि सोनिया गांधी यांच्यातील बैठकीनंतर गहलोत यांची नेमकी भूमिका काय असणार हे समोर येईल.
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक असली तरी, राजस्थानमध्ये अस्थिर परस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अशोक गहलोत यांनी प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतासरा, मंत्री शांती धारीवाल, खाचरियावास यांची भेट घेतल्यानंतर गहलोत हे राजभवनात गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसे झाले नाही.
बुधवारी रात्री उशिरा गहलोत हे सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्या 102 आमदारांचे काय म्हणणे आहे हे सांगतील. मात्र, मुख्यमंत्री पदाचा ते राजीनामा देतील ही शक्यता खाचरियावास यांनी फेटाळून लावली आहे.
कॉंग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत तर, निरिक्षकांच्या अहवालानंतर गहलोत यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे ते पुन्हा अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. शिवाय सचिन पायलट यांच्या नावाबाबत काय तो निर्णयही सोनिया गांधी आणि त्यांच्या बैठकीतच होईल असेही सांगण्यात आले आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी गहलोत यांनी संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल, पक्षाचे प्रतोद महेश जोशी आणि सभागृहाचे अध्यक्ष धर्मेंद्र राठोड यांची भेट घेतली. यामध्य कारणे दाखवा नोटीसबाबत चर्चा झाल्याचे समजत आहे. रविवारी झालेल्या घडामोडीच्या अनुषंगाने ही भेट होती.
