आनंद वार्ताः देशात पहिल्यांदाच आढळला लिथियमचा साठा, भूगर्भ शास्त्रज्ञांना सापडल्या सोन्याच्या नव्या खाणी!
देशातील 11 राज्यांमध्ये सोने आणि लिथियमसह इतर खनिजांचा साठा आढळला आहे. जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (GSI) ने 51 ब्लॉक राज्य सरकार आणि कोळसा मंत्रालयाकडे सोपवले आहेत.

नवी दिल्लीः देशात प्रथमच लिथियम (Lithium) धातूचे साठे आढळले आहेत. याची क्षमता 59 लाख (5.9 दशलक्ष) टन एवढी आहे. लिथियम सोबतच सोन्याचे (Gold) 5 ब्लॉकदेखील सापडले आहेत. लिथियम धातूचे साठे देशात प्रथमच आढळल्याचा दावा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (GSI) ने केला आहे. लिथियम हा धातू सध्याच्या तंत्रज्ञान युगात अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.मोबाइल, इलेक्ट्रिक वाहन, सोलार पॅनलमध्ये लिथियम धातूचा वापर अनिवार्य आहे. लिथियम आयन बॅटरीशिवाय या वस्तू तयार होऊ शकत नाही. भारतात या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आतापर्यंत भारत लिथियमसाठी इतर देशांवरच अवलंबून होता. हे साठे वापरात आले तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठं पाऊल ठरेल.
Geological Survey of India has for the first time established 5.9 million tonnes inferred resources (G3) of lithium in Salal-Haimana area of Reasi District of Jammu & Kashmir (UT).@GeologyIndia
1/2 pic.twitter.com/tH5uv2BL9m
— Ministry Of Mines (@MinesMinIndia) February 9, 2023
काश्मीरात सोन्याच्या खाणी?
भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये सोन्याच्या खाणी आढळून आल्या आहेत. येथील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना परिसरात 5.9 मिलियन टन लिथियमचे साठे आढळले आहेत.
आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाचे
खाण मंत्रालय विभागाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी सांगितलं की, देशात प्रथमच जम्मू काश्मीरच्या रियासी येथे लिथियमचे साठे आढळले आहेत. मोबाइल फोन असो किंवा सोलर पॅनल. प्रत्येक उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरी आवश्यक असते. या बॅटरीसाठी भारत आजवर अन्य देशांवर अवलंबून होता. आता ही आयात कमी होण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकारांना अहवाल पाठवला
जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने 62 व्या CGPD च्या बैठकीदरम्यान, लिथियम आणि सोन्यासहित 51 खनिजांचे साठे आढळल्याची माहिती विविध राज्य सरकारांना पाठवली आहे. यापैकी 5 ब्लॉक सोन्याचे आहेत. लिथियम आणि सोन्यासह पोटॅश, मोलिब्डेनम, बेस मेटलशी संबंधित इतर ब्लॉक आहेत. हे धातू एकूण 11 राज्यांतील विविध जिल्ह्यांत सापडले आहेत. यात जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण आदींचा समावेश आहे.
लिथियम आयातीत भारत चौथा
भारतात मोठ्या प्रमाणावर लिथियमची आयात केली जाते. २०२० पासून भारत लिथियम आयातीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. यापैकी ८० टक्के भाग चीनकडून मागवला जातो. आत्मनिर्भन बनण्यासाठी हे लिथियम अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया आदी देशांकडून खरेदी करण्याचा भारताचा विचार आहे.
युक्रेन आणि रशिया युद्धाच्या कारणांपैकी महत्त्वाचं कारण म्हणजे युक्रेनच्या जमिनीत आढळणाऱ्या व्हाइट गोल्ड अर्थात लिथियमच्या खाणी. तेथील लिथियमचा योग्य वापर झाला तर युक्रेन हा लिथियम निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनू शकतो.
