एक मुलगा सांभाळता आला नाही त्यांना… माजी मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यावर पलटवार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यांच्या नऊ मुलांबद्दल एक विधान केले होते. त्यावरून माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी जोरदार पलटवार केला आहे. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यांच्यावर टीका केली होती. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्या नऊ मुलांबद्दल भाष्य करताना ‘इतना बाल-बच्चा’ असे विधान केले होते. त्यावरून माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी पलटवार केला आहे. नितीश कुमार यांना मुलगा आहे आणि त्याला देखील ते सांभाळू शकले नाही, अशा शब्दात राबडी देवी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे.
नितीश कुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान गैरवर्तन केले. त्यांची ही अडचण आहे की आम्हाला नऊ मुले आहेत. आम्ही कुटुंबासह राज्य चालवले आहे हे त्यांना कळायला हवे. गरज पडली तर आपण देशही चालवू शकतो. आमची सर्व मुले स्वत:च्या पायावर उभी आहेत. आता पती-पत्नी घर चालवतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून आरजेडी उमेदवार आणि त्यांची मोठी मुलगी मीसा भारती निवडणूक लढवीत आहेत. मोदी यांनी प्रचारादरम्यान तेजस्वी यादव यांच्या तुरुंगात जाण्याबाबत टीका केली होती. त्यावर बोलताना राबडीदेवी यांनी ‘तुम्हाला जी काही शिवीगाळ करायची असेल ती करा, त्याला तुरुंगात पाठवा. सर्व काही केले आहे. आणखी काय करणार आहात? निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पराभवाचा सामना करावा लागेल असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी यांच्या ध्यानधारणेवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘देवाने पाठवले असे काही जण म्हणत आहेत. ‘देवाने आपल्याला 10 वर्षासाठी पाठवले आहे. त्या 10 वर्षात आपण देशासाठी काय केले? 10 वर्षांनंतर काही पुन्हा जन्माला येतात. देवच आपल्याला, प्रत्येकाला त्यांना जन्म देतो असा टोला त्यांनी लगावला.
