भारताचे पाकिस्तान विरोधात आणखी एक मोठे पाऊल, थेट इम्रान खान आणि बिलावलवर…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. पाकिस्तानी नागरिकांवर निर्बंध, पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठे पाऊल भारताने उचलले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरू आहे. प्रथम पाकिस्तानी नागरिकांचे भारतात राहणे आणि त्यानंतर पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल भारतात बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. यासोबतच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि पाकिस्तानी वेबसाइटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. आता भारताने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने पुन्हा एकदा कारवाई करत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सोशल मीडिया एक्स खाते भारतात बंद केले आहे.
भारतात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचे एक्स खाते ब्लॉक करण्यात आले आहे. ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतविरोधी कृती आणि वक्तव्यांना पाहून करण्यात आली आहे. दरम्यान, इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. यापूर्वीही सरकारने अनेक पाकिस्तानी व्यक्तींचे इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि यूट्यूब भारतात बंद केले होते. यामध्ये हानिया आमिर आणि माहिरा खान यांच्यासह अनेक पाकिस्तानी कलाकरांचे खाते आहेत. पाकिस्तानी नागरिकांच्या सातत्यपूर्ण वक्तव्यांमुळे भारत सरकारकडून ही कारवाई करण्यात येत आहे. वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया
एक दिवसापूर्वी मंत्र्याने केला होता मोठा दावा
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री अताउल्लाह तरार यांच्या ‘X’ खात्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांनी एका दिवसापूर्वी दावा केला होता की इस्लामाबादकडे विश्वसनीय गुप्तचर माहिती आहे, ज्यामुळे असे दिसून येते की 22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्ली 24 ते 36 तासांच्या आत शेजारील देशावर लष्करी हल्ला करू शकते.
भारताकडून सातत्याने होत असलेली कारवाई
भारताने पाकिस्तानच्या सुमारे 16 यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. गृहमंत्रालयाच्या शिफारशीवरून ही कारवाई करण्यात आली होती. ज्या खेळाडूंचे सोशल मीडिया हँडल देशात बंद करण्यात आले होते. त्यामध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, शोएब अख्तर आणि इतर अनेकांचा समावेश आहे. यापूर्वी, दहशतवादी हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, बासित अली आणि शोएब अख्तर यांच्या यूट्यूब चॅनेलवरही भारतात बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतर प्रतिबंधित यूट्यूब चॅनेलच्या यादीत डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज आणि जिओ न्यूज यासारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.
